११ बालकांवर लवकरच बालाजी रुग्णालय, मुंबई येथे मोफत हृदय शस्त्रक्रिया
सोलापूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK), बार्शी यांच्या वतीने बालाजी रुग्णालय, मुंबई यांच्या सहकार्याने सुश्रुत रुग्णालय, बार्शी येथे ० ते १८ वर्षे वयोगटातील बाल लाभार्थ्यांसाठी मोफत हृदयरोग तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ८२ बाल लाभार्थ्यांची २ डी इको तपासणी करण्यात आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. इरफान सय्यद तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिता बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले. डॉ. जयश्री मिश्रा यांनी बाल लाभार्थ्यांची हृदय तपासणी केली.
तपासणीअंती ११ बाल लाभार्थ्यांना हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले. ३० बालकांना पुढील तपासणीसाठी, ४ बालकांना औषधोपचारासाठी, तर २ बालकांना उच्चस्तरीय उपचार केंद्राकडे संदर्भित करण्यात आले. ३५ बाल लाभार्थी सामान्य असल्याचे तपासणीत आढळून आले.
हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या ११ बाल लाभार्थ्यांवर बालाजी रुग्णालय, मुंबई यांच्या माध्यमातून लवकरच मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे गरजू बालकांना वेळेवर निदान व आवश्यक उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
शिबिराच्या आयोजनासाठी सुश्रुत रुग्णालय, बार्शी येथील डॉ. संजय अंधारे यांचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, बार्शी येथील चारही पथकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, कुर्डुवाडी, माढा व करमाळा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शिबिराच्या आयोजनास सहकार्य केले.
बालकांमधील हृदयरोगाचे लवकर निदान करून त्यांना वेळेत उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित हे शिबिर ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बाल आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम ठरले. ८२ बालकांची तपासणी होऊन ११ बालकांच्या मोफत हृदय शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाल्याने या उपक्रमातून गरजू बालकांना मोठा लाभ मिळणार आहे.










