माझी वसुंधरा अभियान, सोलापूर महापालिका, वृक्षविनायक परिवार व गणेशयुगतर्फे गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
सोलापूर : गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने सोलापूर महानगरपालिका, वृक्षविनायक परिवार आणि गणेशयुग परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शनिवारी सकाळी सात रस्ता परिसरातील इनडोअर स्टेडियम येथे ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.या कार्यशाळेचे उद्घाटन सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निर्मला जंगम, कामगार कल्याण समितीच्या सभापती श्रद्धा पवार, विधी सल्लागार समितीचे सभापती सत्यजित वाघमोडे, उद्यान व मंडई समितीचे सभापती राजशेखर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.





कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत स्वतःच्या हाताने शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या. वृक्षविनायक परिवार, कृष्णाली सेवा सहकारी संस्था, गणेशयुग परिवार तसेच पर्यावरणपूरक गणेशमूर्तीकार जाधव यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती निर्मितीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.वैशाली गुंड, आनंदी विभूते, विकास गोसावी, मनाली जाधव, अभिजली जाधव, आर्यन विभूते आदी मूर्तिकारांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती तयार करण्याच्या विविध टप्प्यांबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना केवळ गणेशमूर्ती तयार करण्याचा आनंद मिळाला नाही, तर शाडू मातीच्या मूर्तींचे पर्यावरणीय महत्त्व, विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण आणि पर्यावरण संवर्धनाची गरज याबाबतही माहिती देण्यात आली.
गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी शाडू मातीच्या व पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर वाढावा, जलस्रोतांचे प्रदूषण कमी व्हावे आणि जलचरांचे संरक्षण व्हावे, यासाठी या कार्यशाळेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. ‘माझा गणपती, माझी जबाबदारी आणि माझे पर्यावरण’ हा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.





महापौर विनायक कोंड्याल यांचे आवाहन
यावेळी महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, गणेशोत्सव हा सोलापूरकरांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि सामाजिक एकतेचा उत्सव आहे. हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असताना पर्यावरणाचे संवर्धन आणि प्रदूषणमुक्त गणेशोत्सव ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. याच उद्देशाने सोलापूर महानगरपालिका आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, नागरिकांना आणि गणेशभक्तांना शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळत आहे. आपल्या स्वतःच्या हाताने तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणरायाची स्थापना करण्याचा आनंद निश्चितच वेगळा असतो.
ते पुढे म्हणाले, गणेशमूर्ती विसर्जनानंतर जलस्रोतांमध्ये प्रदूषण होऊ नये, जलचरांचे नुकसान होऊ नये आणि आपल्या शहरातील पर्यावरणाचा समतोल कायम राहावा, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘माझा गणपती, माझी जबाबदारी आणि माझे पर्यावरण’ या भावनेतून प्रत्येक कुटुंबाने पर्यावरणपूरक गणेशमूर्तीला प्राधान्य देणे आवश्यक आहे.





आपली भावी पिढी स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त सोलापूरमध्ये वाढावी, यासाठी आजपासूनच पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उत्सवही व्हावा, हा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. श्रद्धा आणि परंपरा जपत निसर्गाचेही रक्षण करता येते. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती टाळून शाडू मातीच्या व पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर करावा,असे आवाहन महापौरांनी केले.
तसेच, नागरिकांनी गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेला सहकार्य करावे. निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करावे सोलापूरकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव—स्वच्छ, सुंदर आणि हरित सोलापूर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणावी. गणरायाच्या आगमनाबरोबर आपल्या शहराच्या पर्यावरणाचीही काळजी घेऊया आणि सर्वांनी मिळून आदर्श गणेशोत्सव साजरा करूया, असे महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी सहायक आयुक्त शशिकांत भोसले, यूसीडी प्रमुख समीर मुलाणी, स्वप्नील सोलनकर, पर्यावरण व्यवस्थापक यांनी विशेष परिश्रम घेतले.










