तडजोडीने महसुली प्रकरणे निकाली काढण्यासाठी वादी-प्रतिवादींनी उपस्थित राहण्याचे आवाहन
सोलापूर : महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत उत्तर सोलापूर व बार्शी तालुक्यांसाठी बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ आणि बुधवार, दि. १६ डिसेंबर २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, सोलापूर क्र. १ येथे महसूल लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.
शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, दि. १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत हे अभियान राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी अभियानासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे. या कार्यक्रमानुसार, उत्तर सोलापूर व बार्शी तालुक्यांतील संबंधित महसुली प्रकरणांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, सोलापूर क्र. १, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर येथे लोक अदालत होणार आहे.
तडजोडनामा दाखल करण्याचे आवाहन
संबंधित प्रकरणांतील वादी व प्रतिवादी पक्षकारांना आपापसांत तडजोड करून प्रकरणे निकाली काढण्याची संधी या अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. ज्या पक्षकारांना तडजोडनामा दाखल करावयाचा आहे, त्यांनी निर्धारित दिवशी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आपल्या विधिज्ञांसह उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपस्थित राहून आवश्यक अर्ज व तडजोडनामा दाखल करावा. महसुली प्रकरणांचा परस्पर सहमतीने निपटारा करण्यासाठी संबंधित पक्षकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी कार्यालय, सोलापूर क्र. १ यांच्यामार्फत करण्यात आले आहे.










