सोलापूर : बीएसएनएलने अद्यापही थकबाकी भरली नसल्याने होटगी रोडवरील सब डिव्हिजन कार्यालयाचे सील जैसे थे आहे. दरम्यान, महापालिकेने बीएसएनएलचे बिल अदा केले असल्याची माहिती उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली.
सोलापूर महापालिका मिळकत कर वसुली पथकाकडून मंगळवार दि. 28 मार्च रोजी होटगी रोडवरील बीएसएनएलचे सब डिव्हिजन कार्यालय 75 लाख 67 हजार 553 रुपयाच्या मिळकत कर थकबाकीपोटी सील करण्यात आले. तसेच येथील पाण्याचे 2 नळही बंद करण्याची कारवाई केली होती. त्यानंतर बीएसएनएलच्या संबंधित अधिकाऱ्यांनी थेट महापालिकेत धाव घेऊन मिळकत कराची आकारणी अधिक केल्याचा आक्षेप घेतला होता. दीड महिना उलटला बीएसएनएलच्या संबंधित कार्यालयाने थकबाकी भरली का ? या संदर्भात उपायुक्त पोळ यांना विचारले असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.
बीएसएनएलच्या हरकतीला कायदेशीर आधार नाही. यामुळे पूर्ण थकबाकी भरल्याशिवाय सील काढण्यात येणार नाही, असे उपायुक्त पोळ यांनी स्पष्ट केले. महापालिका प्रशासनाने बीएसएनएलचे बिल भरले आहे. त्यामुळे महापालिका आता कोणत्याही प्रकारचे बीएसएनएलला देणे नाही, असेही उपायुक्त विद्या पोळ यांनी सांगितले.