‘सर्वसामान्य नागरिक, भाविक व वारकऱ्यांना योजनांची माहिती मिळेल’ – जिल्हाधिकारी कार्तिकेयन

पंढरपूर – श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत सुरू असलेल्या ‘संवाद वारी’ या शासकीय योजनांच्या प्रचार-प्रसार उपक्रमाला सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आज भेट दिली. अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयासमोर माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी प्रदर्शनातील पॅनेल, एलईडी व्हॅन व चित्ररथाची पाहणी करून विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती जाणून घेतली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, “हा उपक्रम चांगला असून यातून सर्वसामान्य नागरिक, भाविक व वारकऱ्यांना शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सहजपणे मिळेल. वारीच्या निमित्ताने लाखो लोक एकत्र येतात, त्यामुळे योजनांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी हे योग्य व्यासपीठ आहे.”
‘संवाद वारी’च्या माध्यमातून कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, रोजगार, गृहनिर्माण आदी विभागांच्या योजनांची माहिती पथनाट्य व एलईडीद्वारे देण्यात येत आहे. श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी संवाद वारी हे प्रदर्शन नागरिकांसाठी भरवण्यात येत आहे. तरी या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.











