महापालिका प्रशासनाने प्रशासकीय कालावधीमध्ये मनमानी पैसा खर्च करून टॅक्स रूपाने जमा केलेल्या महापालिकेच्या पैशावर एक प्रकारे डल्लाच मारला आहे. निवडणूक खर्च असो,नालेसफाई असो, आदीला नदीतील गाळ काढणे किंवा संभाजी तलावातील जलपर्णी काढणे असो की महापालिकेच्या कौन्सिल हॉलची रंगरंगोटी असो यामध्ये कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. त्यातच महापालिका पदाधिकाऱ्यांमध्ये एक वाक्यता नसल्यामुळे प्रशासन वरचढ ठरले आहे.त्यामुळे आज सायंकाळी होणारी महापालिकेची सभा अशा या वादग्रस्त विषयामुळे वादळी ठरणार आहे. आज सायंकाळी साडेचार वाजता कौन्सिल हॉलमध्ये जुलै महिन्याची सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे त्यामुळे या सभेत प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी अनेक नगरसेवक तयारीत आहेत.











