आठ दिवसांत उपाययोजनांचा सविस्तर अहवाल; १५ दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निर्देश
सोलापूर, दि. ३ : अमरावती येथील नवजात शिशू अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि सुरक्षित करण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी तातडीने आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करून, त्यातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अधिपत्याखालील जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय आणि जिल्ह्यातील १९ तालुका, उपजिल्हा रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
हे ऑडिट संबंधित यंत्रणांनी त्यांच्या उपलब्ध निधीतून करून घ्यावे. निधी उपलब्ध नसल्यास जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करावी. आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले.
फायर व इलेक्ट्रिक ऑडिटमध्ये आढळून येणाऱ्या त्रुटी तसेच त्यानुषंगाने करावयाच्या उपाययोजनांचा सविस्तर अहवाल पुढील आठ दिवसांत सादर करावा. तसेच संबंधित रुग्णालयांचे १५ दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत थर्ड पार्टी ऑडिट करून घेणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक रुग्णालयात आवश्यकतेनुसार सॅण्ड बकेट उपलब्ध असणे, तसेच अग्निसुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक साधनसामग्री कार्यरत स्थितीत असणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
प्राथमिक आरोग्य केंद्रांचीही तपासणी करण्याचे निर्देश
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने त्यांच्या अखत्यारितील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व रुग्णालयांमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणा सुस्थितीत आहे का, याची तपासणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अग्निशामक सिलिंडर योग्य स्थितीत आहेत का, त्यांची मुदत व कार्यक्षमता यांचीही तपासणी करावी, असे त्यांनी सांगितले.
आवश्यक दुरुस्ती व देखभालीसाठी निधीची गरज असल्यास ग्रामपंचायतींना प्राप्त झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करण्यासाठी कार्यवाही करावी. यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
फायर व इलेक्ट्रिक ऑडिटमध्ये विलंब
बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उपाधिष्ठाता डॉ. विद्या तीरणकर यांनी अमरावती येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर सामान्य रुग्णालयात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट २०२३ नंतर झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी त्यांच्या अधिपत्याखालील रुग्णालयांचे फायर ऑडिट २०२४ नंतर झाले नसल्याची माहिती दिली.
बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कमलाकर माने, अग्रजा चिटणीस, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, १०८ रुग्णवाहिका सेवेचे जिल्हा समन्वयक काळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.











