१,६०३ श्रीसदस्यांचा सहभाग; निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मितीचा उपक्रम






सोलापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा अलिबाग, जिल्हा रायगड यांच्या सौजन्याने सोलापूर शहरात निर्माल्य संकलन अभियान २०२६ राबविण्यात आले. पद्मश्री तीर्थरूप डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण तीर्थरूप डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली अनंत चतुर्दशीच्या दिवशी, २५ सप्टेंबर रोजी हा उपक्रम राबविण्यात आला. या अभियानात सोलापूर शहरासह मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील तब्बल १,६०३ श्रीसदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
गणेश विसर्जनासाठी विविध ठिकाणी आलेल्या भाविकांनी हार, फुले, दुर्वा तसेच अन्य निर्माल्य पाण्यात विसर्जित न करता प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांकडे जमा केले. यामुळे तलाव, विहिरी आणि अन्य जलस्रोतांमध्ये निर्माल्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यास मदत झाली. संकलित निर्माल्यातून प्लास्टिक, थर्माकोल आणि अन्य विघटन न होणाऱ्या वस्तू वेगळ्या करण्यात आल्या. उपयुक्त निर्माल्य सेंद्रिय खतनिर्मितीसाठी पाठविण्यात आले, तर अनुपयुक्त साहित्य महापालिकेच्या घंटागाड्यां द्वारे योग्य पद्धतीने विल्हेवाटीसाठी पाठविण्यात आले.
सोलापूर शहरातील श्री सिद्धेश्वर तलावाच्या गणपती घाटावरून २,९७७ किलो, विष्णू घाटावरून ६,१०९ किलो, विडी घरकुल म्हाडा विहिरीतून ४,४५६ किलो, धर्मवीर संभाजीराजे तलाव (कंबर तलाव) येथून ४,९४७ किलो आणि हिप्परगा तलावातून ४,७६८ किलो उपयुक्त निर्माल्य संकलित करण्यात आले. अशा प्रकारे एकूण २३ हजार २५७ किलो उपयुक्त निर्माल्याचे संकलन झाले. अनुपयुक्त निर्माल्य वाहतुकीसाठी महापालिकेच्या ७४ घंटागाड्यांचा वापर करण्यात आला.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, महापौर विनायक कोंड्याल, सहाय्यक आयुक्त संदीप कारंजे तसेच शहरातील नागरिकांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रतिष्ठानच्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्याचे नागरिकांनी कौतुक केले.
सोलापूर शहराबरोबरच बार्शी, कुर्डूवाडी, पंढरपूर, वेळापूर, अकलूज आदी ठिकाणीही प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविण्यात आला. मागील चार वर्षांपासून सोलापूर शहरात हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. संकलित निर्माल्यापासून तयार होणारे सेंद्रिय खत प्रतिष्ठानतर्फे करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडी साठी वापरण्यात येते. उर्वरित खत शेतकऱ्यांना शेतीसाठी देण्यात येते. त्यामुळे गणेशोत्सवातील धार्मिक भावनेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत निर्माल्याचा पुनर्वापर करण्याचा आदर्श उपक्रम प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात आला.











