स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियोजन समितीचा निधी व्यपगत होणार नाही याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी

0
77

सोलापूर :- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात 148 ग्रामपंचायती मध्ये निवडणुक पोट निवडणूक कार्यक्रम,तर महाळुंग, वैराग, नातेपुते, माढा, माळशिरस या नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. तसेच संभाव्य स्थानिक इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून विविध शासकीय विभागांना मंजूर करण्यात आलेला निधी त्याच कामावर व वेळेत खर्च होणे अपेक्षित आहे. हा निधी कोणत्याही कारणास्तव व्यपगत होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.

     जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित शासकीय विभाग प्रमुखाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, विभागीय वन अधिकारी धैर्यशील पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, मुख्य वित्त व लेखाधिकारी अजय सिंह पवार यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी शंभरकर पुढे म्हणाले की, जिल्‍हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत मंजूर असलेल्या निधीतून प्रस्तावित केलेल्या कामांना प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करताना संबंधित विभागांनी निवडणूक जाहीर झालेली 148 गावे व नगरपंचायती वगळून विकासकामांचे प्रस्ताव सादर करावेत. अशा प्रस्तावांना तात्काळ प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. तसेच संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन सर्व विभाग प्रमुखांनी त्यांना मंजूर करण्यात आलेल्या निधीतून वेळेत कामे पूर्ण करून घ्यावी. मंजूर असलेला निधी व्यपगत होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.

     यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव प्राप्त न झालेल्या विभागांचा सविस्तर आढावा घेऊन तात्काळ प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश दिले. तसेच माहे मार्च 2022 अखेर मंजूर निधी खर्च झाला नाही तर संबंधित विभाग प्रमुख यांना जबाबदार धरण्यात येईल, असेही त्यांनी सूचित केले. 

     प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर न केलेल्या विभागाची माहिती दिली. तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 साठी सर्व विभागांनी तात्काळ आराखडे सादर करण्याची सूचना केली.

स्वच्छता अभियान पुस्तिकेचे प्रकाशन

     जिल्हा परिषद शाळा स्वच्छता अभियान कक्षामार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या स्वच्छता अभियान पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते नियोजन समितीच्या सभागृहात संपन्न झाले. यावेळी स्वच्छता अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक सचिन जाधव ही उपस्थित होते.