सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्रशासक मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या धाडसी निर्णयामुळे मंगळवेढ्यातील कासेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस नवसंजीवनी मिळणार आहे. १२ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या या योजनेची पाहणी त्यांनी केली. कासेगावनंतर त्यांनी शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचीही पाहणी केली. कासेगाव योजनेच्या वीजबिलाची कटकट बंद करण्यासाठी सोलारचा पर्याय उपलब्ध करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

बंद पडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ववत करण्यासाठी सीईओ मनीषा आव्हाळे यांचा प्रयत्न सुरु आहे. जेणेकरून दुष्काळातील टंचाईच्या झळा कमी होऊन नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही. या पाहणी दौऱ्यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटोकधोंड, सांगोल्याचे उपअभियंता सुरेश कमळे, उपअभियंता श्री. पांडव, बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. लवटे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता श्री माने, सहप्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गंत येत असलेल्या गावांचे ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते.
जलजीवन मिशनच्या कामांना गती देत असतानाच सध्या पाणीटंचाईचा सामना करीत असलेली कासेगाव प्रादेशिक योजना पूर्ववत करण्याचा त्यांनी धाडसी निर्णय घेतला. ही योजना सोलारवर कशी सुरु राहील, यासंदर्भातही नियोजन करण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. राष्ट्रीय महामार्गामुळे कासेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस काही अडचणी होत्या. वाखरी तळाजवळील पाणीपुरवठा योजनेस भेट देऊन त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या प्रयत्नामुळे पाईपलाईन शिफ्टींगचे काम जलदगतीने होईल अशी आशा आहे. कासेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जलजीवन मिशममध्ये समाविष्ठ केल्याचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी सांगितले.