जलशक्ती अभियानाच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्ष राहावे – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

0
49

सोलापूर :- केंद्र पुरस्कृत जलशक्ति अभियानाअंतर्गत जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करून आपल्या जिल्ह्याची भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी दक्ष राहून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

   व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे जलसंधारण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री नंदलाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जलशक्ति अभियान कार्यशाळेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर जिल्हा स्तरावरील शासकीय यंत्रणेला मार्गदर्शन करत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी रोहयो श्रीमती देशमुख, जिल्हा जलसंधारण अधिकारी अण्णासाहेब कदम, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी श्री. भोसले, वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख व अन्य अधिकारी उपस्थित होते. 

      जलशक्ती अभियानाअंतर्गत पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करण्याचे नियोजन असून ही केंद्र पुरस्कृत योजना आहे व या योजनेची अंमलबजावणी राज्य शासनाकडून होणार असल्याने सर्व संबंधित विभागांनी या योजनेची सविस्तर माहिती घेऊन आपल्या विभागामार्फत जल संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती तयार ठेवावी असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगून या अनुषंगाने संबधित विभाग प्रमुखांची स्वतंत्र बैठक लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

      जलसंधारण विभागाने या अभियानांतर्गत जिल्हा स्तरावर जलशक्ति केंद्राची तात्काळ स्थापना करण्याची कार्यवाही करावी. केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे या केंद्रातून अभियानाच्या अनुषंगाने कामकाज करावे अशी सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली. तसेच या अभियानाच्या अनुषंगाने अभियानाचे कामकाज व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडावे असेही त्यांनी सूचित केले.

    प्रारंभी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. कदम यांनी जलशक्ति अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरील कामकाजाची माहिती दिली.