सोलापूर : पाठीवर चापट मारल्याचा रोष मनात धरून दोन महिलासह चौघा जणांनी माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या मुलास मारहाण केली. ही घटना रेल्वे लाईन परिसरातील कोनापुरे चाळीत रविवारी दुपारी घडली. रविराज ऊर्फ जोएल जॉन फुलारी असं जखमी तरुणाचं नाव आहे. या मारहाणीत त्याच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन काढून घेण्यात आलीय. याप्रकरणी चौघा जणाविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
रेल्वे लाईन-कोनापुरे चाळीतील रहिवासी तथा माजी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांचा मुलगा रविराज उर्फ जोएल, त्याच्या घरासमोरील मोकळ्या पटांगणात त थांबला होता. तो बेसावध स्थितीत थांबला असताना, त्याच गल्लीतील लकी नावाच्या मुलाने त्यास सायकलने धडक दिली. त्यातून रविराजने लकीच्या पाठीवर चापट मारली. त्याने लकीला चापट मारल्याचे पाहून आलेल्या श्रीनिवास कुमार व अन्य तिघांनी रविराजला (वय -१८ वर्षे) खाली पाडून हाताने लाथा-बुक्क्यासह विटांनीही मारहाण केली. या मारहाणीदरम्यान श्रीनिवास कुमार यांनी रविराजच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चैन जबरीने काढून घेतली. याप्रकरणी जखमी रविराज उर्फ जोएल जॉन फुलारी याने सदर बझार पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. त्यानुसार श्रीनिवास कुमार याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रवि कुमार, रवि कुमारची आई, रविची बहिण सुजाता (सर्व रा. कोनापुरे चाळ, सोलापूर) अशी अन्य आरोपींची नावे आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला तपास करीत आहेत.