सोलापुरात उन्हाळ्यात तापमानाचा पारा वाढत असतो .यामुळे माणसांचेच काय तर पशुपक्ष्याचे अतोनात हाल होतात. बसव नगरचे पोलीस पाटील प्रवीण राठोड आपल्या “पक्षी जलपात्र” उपक्रमात सांगतात की, नैसर्गिक पाण्याचे सर्व स्त्रोत पूर्णपणे आटले आहेत. यामुळे चिमणी आणि इतर पक्ष्यांचे पाण्याअभावी हाल होतात. पाण्याने तहानलेल्या चिमण्या, पक्षी बेशुद्ध अवस्थेत पडलेले आपण अनेकदा पाहतो. जाणकारांच्या मते चिमण्या,पक्ष्यांना पाणी न मिळाल्यामुळे त्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊन आकाशात उडता-उडता अचानक जमिनीवर पडतात अथवा तारेमध्ये अडकून मृत्युमुखी पडतात. अशा एक ना अनेक कारणामुळे चिमणी पक्षी गंभीररित्या आपला जीव गमावतात. उन्हाळ्यात पाण्याविना माणसांच्या अंगचीही लाही-लाही होते तर चिमुकल्या पक्ष्यांची काय वणवा होत असेल, मैल न मैल पाण्याची व्यवस्था नसल्याने रानातील पक्ष्यांची काय दुरवस्था/हाल होत असेल याची कल्पना नाही केलेली बरी.
उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांची होणारी दुरावस्थेची कल्पना करून बसवनगरचे (दक्षिण सोलापूर) पोलीस पाटील प्रविण राठोड यांनी गाव परिसरात व आजूबाजूच्या गावात चिमणी व इतर पक्ष्यांना पाण्याची सोय व्हावी यासाठी “पक्षी जलपात्र” हा सामाजिक उपक्रम गेल्या चार वर्षापासून स्व-खर्चाने राबवत आहेत. यासाठी ते स्वतः माठाचे पक्षी जलपात्र तयार करून जिथे पाण्याची व्यवस्था नाही अशा वाड्या-वस्त्यावर,शासकीय कार्यालयात,कॉलेजमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये,पोलीस स्टेशन आवारात,तहसील आवारात,ग्रामीण रुग्णालय परिसरात,विद्युत पारेषण कार्यालय परिसरात अशा अनेक ठिकाणी पक्षी येतील अशा ठिकाणी जलपात्र बांधून दोन दिवसात एकदा जलपत्रात पाणी ठेवण्याची विनंती करत आहेत. प्रत्येकाने स्व-इच्छेने चिमणी,पक्षी बचाव चळवळ उभी करून प्रत्येक कुटुंबाने आपली प्रमुख जबाबदारी समजून चिमणी पक्ष्यांना पाण्याची सोय व्हावी यासाठी प्रत्येकाने आपल्या घरासमोर,छतांवर,झाडांवर पक्षी जलपात्र ठेवून निसर्गातील जीवांची काळजी घ्यावी, जेणेकरून निसर्गातून लुप्त होत चाललेली अनेक प्रकारे किलबिल करणारी मधुर नैसर्गिक संगीत ऐकावयास मिळेल.
यासाठी पोलीस पाटील प्रविण राठोड स्वतः हाताने माठाचे पक्षी जलपात्र तयार करून मोफत भेट देत आहेत, जेणेकरून उन्हाळ्यात चिमणी,पक्षी जलपात्रातील थंड पाण्याने आपली तहान भागवतील व पाण्याविना होणारे चिमण्या,पक्ष्यांचे प्राण वाचण्यास मदत होईल या भावनेने हे उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.










