डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिकेच्या रुग्णालयात कर्तव्य बजावत असताना डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या अमानुष व हिंसक हल्ल्यामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. रुग्णसेवेत व्यस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील हा हल्ला केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर झालेला आघात आहे. या गंभीर घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA), महाराष्ट्र राज्य शाखेने आणि सोलापूर शाखेने राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली होती. परंतु माननीय मुंबई हायकोर्टाने सुमोटो अंतर्गत स्वतः दखल घेऊन गुन्हेगार रमेश म्हात्रे व त्याच्या साथीदारांना खालच्या कोर्टाने दिलेला जामीन तात्काळ काल शनिवारी दुपारी रद्द केला आणि सर्व वैद्यकीय संघटनांना संप न करण्याची विनंती केली.
त्यामुळे, माननीय हायकोर्टाच्या विनंतीला मान देऊन सोमवार, दिनांक २० जुलै २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजेपासून ते मंगळवार, दिनांक २१ जुलै २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजेपर्यंत (२४ तास) राज्यभरातील सर्व नियमित आरोग्य सेवा बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने रद्द केला आहे. त्यामुळे सोमवारी 20 जुलै रोजी सर्व नियमित ओपीडी (OPD) सेवा काळ्याफिती लावून व इतर सर्व वैद्यकीय सेवा पूर्णपणे चालू राहतील, असे निमाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर आणि निमा सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमनी यांनी सांगितले.
निमा महाराष्ट्र शाखा आणि सर्व वैद्यकीय संघटनांनी घेतलेला संपाचा निर्णय रुग्णांच्या विरोधात नसून, डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व निर्भय कार्यस्थळ मिळवून देण्यासाठी घेण्यात आला होता.
माननीय मुंबई कोर्टाच्या विनंती नंतर निमा संघटनेने आता संप न करता फक्त स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोशींवर तात्काळ कठोर कारवाई करणे, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींवर होणाऱ्या हल्ल्यांसंदर्भात कायद्यात प्रभावी सुधारणा करणे, सदर खटले जलद गतीने चालविणे, अशा खटल्यांयांमध्ये राजकीय हस्तक्षेप दिसल्यास इतर राजकीय नेत्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करणे, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कामावेळी २४ तास सुरक्षा व्यवस्था पुरविणे, सेंट्रल कॉम्प्रेहेन्सीव हेल्थकेअर वायलेंस प्रिवेन्शन कायदा तातडीने लागू करावे, डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना निर्भय वातावरणात सेवा देण्याची कायदेशीर हमी व अखंड सुरक्षिततेची हमी देणारी व्यवस्था तात्काळ लागू करण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन सोलापूर निमा संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक २० जुलै रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकाऱ्यांना काळ्याफिती लावून देण्यात येणार आहे . प्रशासनाकडून तात्काळ मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात बेमुदत आंदोलनाचा कडकइशारा निमा संघटनेमार्फ़त देण्यात आला आहे.