‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत कार्यशाळा
सोलापूर : ‘प्रजा निरोगी, तर राज्य सशक्त’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ या संकल्पनांना केंद्रस्थानी ठेवून गावपातळीवर आरोग्यविषयक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली.
प्रतिबंधात्मक आरोग्याला प्राधान्य द्यावे
मार्गदर्शन करताना डॉ. सतीश कोपुरवाड यांनी गावातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य हे ‘आरोग्य संपन्न गाव’ निर्मितीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. आजार झाल्यानंतर उपचार करण्याबरोबरच आजार प्रतिबंध, आरोग्य संवर्धन, नियमित आरोग्य तपासणी आणि आरोग्यविषयक जनजागृती यावर विशेष भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
गावातील आरोग्यविषयक गरजा ओळखून स्थानिक पातळीवर कृती आराखडा तयार करणे, उपलब्ध आरोग्य सुविधांचा प्रभावी वापर करणे तसेच पात्र नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ पोहोचविणे आवश्यक आहे. ‘निरोगी गाव’ ही संकल्पना केवळ आरोग्य विभागाच्या प्रयत्नातून साध्य होणार नसून ग्रामपंचायत, शिक्षण, पाणीपुरवठा व स्वच्छता, महिला व बाल विकास तसेच इतर संबंधित विभागांच्या समन्वित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अभियानाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन
कार्यशाळेत ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचे पुणे विभागीय समन्वयक अमित शर्मा आणि गणेश ननवरे यांनी अभियानाची अंमलबजावणी, गावपातळीवरील नियोजन आणि विविध उपक्रमांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव यांनी शासन परिपत्रकातील तरतुदी, अभियानाची कार्यपद्धती तसेच अभियानांतर्गत गावांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी विचारात घेतले जाणारे विविध आरोग्यविषयक निर्देशांक याबाबत माहिती दिली.
ग्रामस्तरावर सर्वसमावेशक आरोग्य कृती आराखडा
कार्यशाळेत ग्रामस्तरावर नागरिकांच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवून सर्वसमावेशक आरोग्य कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. संसर्गजन्य व जीवनशैलीशी संबंधित आजारांचे प्रतिबंध, नियमित आरोग्य तपासणी, आरोग्य नोंदींचे अद्ययावतीकरण आणि उपलब्ध आरोग्य सुविधांचा नियमित आढावा घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
महिला, बालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजांकडे विशेष लक्ष देण्यासोबतच स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, पोषण, शिक्षण आणि आरोग्य या घटकांचा परस्पर समन्वय साधण्यावर भर देण्यात आला. आरोग्यविषयक जनजागृतीसोबत नागरिकांमध्ये सकारात्मक वर्तनबदल आणि जनसहभाग वाढविण्यासाठी प्रभावी संवाद साधण्याचे आवाहन करण्यात आले.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचत आहे की नाही, याचे नियमित मूल्यमापन करणे तसेच निर्धारित आरोग्य निर्देशांकांच्या आधारे गावांच्या कामगिरीचे परीक्षण करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
विविध विभागांचा सहभाग
कार्यशाळेस गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका विस्तार अधिकारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, पाणीपुरवठा व स्वच्छता, आरोग्य आदी विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गावातील नागरिकांचे आरोग्य, प्रभावी जनसहभाग आणि विविध विभागांमधील समन्वय यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात ‘आरोग्य संपन्न गाव’ निर्माण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार कार्यशाळेत करण्यात आला.
‘निरोगी नागरिक – आरोग्य संपन्न गाव – सशक्त सोलापूर’ हा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.











