सोलापूर : सिरोसिस म्हणजे यकृत निकामी होण्याकडे जाणारा अपरिहार्य एकमार्गी प्रवास नाही. यकृताला नुकसान करणारे मूळ कारण वेळीच ओळखून त्यावर प्रभावी उपचार केल्यास काही रुग्णांमध्ये फायब्रोसिस कमी होऊन यकृताचे कार्य आणि रचना अंशतः सुधारू शकते, अशी माहिती यशोदा हॉस्पिटल, हायटेक सिटी, हैदराबाद येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी व हेपॅटोलॉजी विभागाचे क्लिनिकल डायरेक्टर व वरिष्ठ सल्लागार डॉ. के. एस. सोमशेखर राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दीर्घकाळ हेपाटायटिस बी, सी, अतिमद्यपान, मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टियाटोटिक लिव्हर डिसीज, ऑटोइम्यून यकृताचे आजार आदी कारणांमुळे यकृताला वारंवार इजा होत राहिल्यास फायब्रोसिस वाढतो आणि त्यातून सिरोसिस होऊ शकतो. मात्र मूळ कारणावर नियंत्रण मिळवल्यास काही प्रमाणात सुधारणा शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यशोदा हॉस्पिटल, हायटेक सिटी, हैदराबाद येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी व हेपॅटोलॉजी विभागात यकृताच्या विविध आजारांचे अत्याधुनिक पद्धतीने निदान व उपचार केले जातात.सिरोसिस, फॅटी लिव्हर, हेपाटायटिस बी व सी, ऑटोइम्यून यकृताचे आजार आदींवर तज्ज्ञांकडून उपचार केले जातात. फायब्रोसिसचे मूल्यांकन करण्यासाठी फायब्रोस्कॅनसारख्या नॉन-इन्व्हेसिव्ह तपासण्यांचा वापर केला जातो.रुग्णाच्या आजाराची अवस्था आणि मूळ कारण लक्षात घेऊन वैयक्तिक उपचारपद्धती निश्चित केली जाते.गंभीर सिरोसिस आणि यकृत निकामी होण्याच्या अवस्थेत लिव्हर ट्रान्सप्लांटेशनसाठी आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन व व्यवस्थापन केले जाते.लवकर निदान, योग्य उपचार आणि नियमित वैद्यकीय देखरेखीवर विभागात विशेष भर दिला जातो.
हेपाटायटिस बी व सीवरील प्रभावी अँटीव्हायरल उपचार, मद्यपान पूर्णपणे बंद करणे, वजन कमी करणे तसेच मेटाबॉलिक समस्या नियंत्रणात ठेवणे यामुळे यकृतावरील नुकसान कमी करण्यास मदत होऊ शकते. ऑटोइम्यून व कोलेस्टॅटिक आजारांवर योग्य उपचारही महत्त्वाचे आहेत.यकृतातील फायब्रोसिसचे मूल्यांकन करण्यासाठी फायब्रोस्कॅन ही नॉन-इन्व्हेसिव्ह तपासणी उपयुक्त ठरत असून, तिचा अहवाल रक्त तपासण्या व इतर वैद्यकीय निष्कर्षांसोबत डॉक्टरांनी तपासणे आवश्यक आहे.
या पत्रकार परिषदेस अतुल चव्हाण, साई कुमार आदी उपस्थित होते.
यकृताच्या आजाराचे लवकर निदान,योग्य उपचार करणे आवश्यक
गंभीर किंवा डिकॉम्पेन्सेटेड सिरोसिसमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचे महत्त्व कायम आहे. त्यामुळे लक्षणे दिसण्याची वाट न पाहता यकृताच्या आजाराचे लवकर निदान आणि योग्य उपचार करणे आवश्यक आहे, असे डॉ. राव यांनी सांगितले











