अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. ४६०/२०२१ अंतर्गत आरोपी संजय दगडू खरात, वय ३४ वर्षे, रा. धर्मगाव, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर याच्याविरुद्ध दिनांक २० जुलै २०२१ रोजी भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम ३०२, ३२३, ५०४ व ५०६ अन्वये दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणात आरोपी संजय दगडू खरात यास दिनांक २० जुलै २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा सत्र खटला क्र. ९३/२०२१ असा असून, आरोपी मागील पाच वर्षांहून अधिक काळापासून सोलापूर येथील कारागृहात होता.
फिर्यादीच्या जबाबानुसार, आरोपीस पत्नी पुनम हिच्या चारित्र्याबाबत व तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे तसेच पत्नीला मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याचे आरोप करण्यात आले होते. दिनांक १६ जुलै २०२१ रोजी आरोपी हा मयत पत्नी व मुलांसह सासरवाडीहून घरी परत जात असताना, भालदार यांच्या शेताजवळ आरोपीने पत्नीला झाडाच्या आड नेऊन तिचा गळा आवळून खून केला व त्यानंतर मुलांना घेऊन तेथून निघून गेला.
सदर प्रकरणात आरोपीतर्फे ॲड शिवरत्न वाघ यांनी असा युक्तिवाद केला की, आरोपी दिनांक २० जुलै २०२१ पासून न्यायालयीन कोठडीत असून, त्यास पाच वर्षे दोन महिन्यांहून अधिक काळ कारागृहात ठेवण्यात आले आहे. इतका प्रदीर्घ कालावधी कारागृहात व्यतीत करूनही खटल्याची सुनावणी अपेक्षित गतीने पुढे गेलेली नाही. आरोपीचा जलद सुनावणीचा घटनात्मक अधिकार बाधित झाला असून, आरोपी पाच वर्षांहून अधिक काळ कारागृहात असतानाही सरकार पक्षाला अद्याप एकाही साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यासाठी उपस्थिती सुनिश्चित करता आलेली नाही. त्यामुळे खटल्याच्या विलंबाचा फटका आरोपीस अनिश्चित काळासाठी कारावासाच्या स्वरूपात बसू नये, असा युक्तिवाद आरोपीतर्फे करण्यात आला.
आरोपीतर्फे करण्यात आलेल्या युक्तिवादाचा तसेच प्रकरणातील परिस्थितीचा विचार करून पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एच. एल. मनवर साहेब यांनी दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपी संजय दगडू खरात यास सत्र खटला क्र. ९३/२०२१ मध्ये जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी,ॲड. वैभव बोंगे, ॲड. ओंकार फडतरे, ॲड.शिवरत्न वाघ, ॲड. मोहीम पठाण, ॲड. मनिष बाबरे, ॲड. रोहित थोरात, ॲड. अजय वाघमारे, ॲड. त्वरिता वाघ, ॲड. भाग्यश्री जगदाळे, ॲड. पैगंबर सय्यद, ॲड. सलामत पटेल, ॲड. संकेत पवार व ॲड. प्रदिप गायकवाड यांनी काम पाहिले.











