22 हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया-पशुसंवर्धन आयुक्तालय, औंध, पुणे-
सोलापूर :- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यभरात ‘ऍनिमल बर्थ कंट्रोल (एबीसी) रुल’ची अंमलबजावणी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रभावीपणे सुरू आहे. दि. २३ सप्टेंबर २०२६ पर्यंत राज्यभरात २२,८५५ भटक्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, २ लाख १ हजार ५१७ कुत्र्यांना व ५६ हजार ७४४ इतर प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. या संपूर्ण मोहिमेत श्वान नसबंदी व रेबीज लसीकरण या दोन्ही आघाड्यांवर पुणे जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ऍनिमल बर्थ कंट्रोल रुलच्या अंमलबजावणीत एकट्या पुणे जिल्ह्यात १५,६९६ श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले असून, हे प्रमाण राज्यातील एकूण शस्त्रक्रियांच्या ६८ टक्के आहे. या यादीत सोलापूर (२,४२८ शस्त्रक्रिया) दुसऱ्या, तर अहिल्यानगर (१,९८५ शस्त्रक्रिया) तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील एकूण नसबंदी शस्त्रक्रियांपैकी तब्बल ८८ टक्क्यांहून अधिक वाटा या तीन जिल्ह्यांचा आहे.
राज्यात प्राण्यांमधील रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी एप्रिल-२०२६ पासून मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण २ लाख ५८ हजार २६१ प्राण्यांचे यशस्वी लसीकरण करण्यात आले आहे. यात कुत्र्यांच्या लसीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. महसुली विभागांचा विचार करता, पुणे विभागाने ५९ हजार ८३५ प्राण्यांच्या लसीकरणासह राज्यात अग्रस्थान पटकावले असून, त्यापाठोपाठ नाशिक विभागात ४० हजार ३९६ प्राण्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यांमध्ये नाशिक (१६,७२८), यवतमाळ (१४, ७५६) व पुणे (१३,७९५) या जिल्ह्यांनी कुत्र्यांच्या लसीकरणात उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. दरम्यान, नागरिक आणि प्राण्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून लसीकरण मोहीम अधिक तीव्र वेगाने राबवली जात आहे.
विशेष प्रशिक्षणामुळे मोहिमेला गती
ही मोहीम अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ, पुणे व राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्था, गोखलेनगर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २३ डिसेंबर २०२५ रोजी औंध (पुणे) येथील ‘सुपर स्पेशालिटी व्हेटरनरी हॉस्पिटल मध्ये उजळणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील ३९ पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षित डॉक्टरांनी पुढे आपापल्या जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षित केले, ज्यामुळे राज्यभरात ही मोहीम प्रभावीपणे राबवणे शक्य होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात भटक्या श्वानांच्या नियंत्रणासाठी ‘ऍनिमल बर्थ कंट्रोल रुल’ची अंमलबजावणी अत्यंत गांभीर्याने व नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. श्वान नसबंदी व रेबीज लसीकरणात पुणे जिल्ह्याने उत्तम कामगिरी केली असून, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही ही प्रक्रिया अधिक गतिमान केली जात आहे. येत्या काळात राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिका यांच्याशी समन्वय साधून श्वान निर्बिजीकरण व लसीकरणाची ही कार्यवाही अधिक वेगाने आणि व्यापक स्तरावर राबवण्याचे नियोजन सुरू आहे.
अशी माहिती आयुक्त पशुसंवर्धन, डॉ किरण पाटील (भा. प्र. से.) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिली









