२० तारखेपर्यंत सर्व मालमत्ता कर बिले वाटप करण्याचे महापौर विनायक कोंड्याल यांचे निर्देश
सोलापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने मालमत्ता कर विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज महापौर कार्यालयात महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली मालमत्ता कर विभागातील सर्व कर निरीक्षकांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, मुख्यलेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, उपायुक्त सोनाली यादव, सहायक आयुक्त युवराज गाडेकर, सहायक आयुक्त विनोद कुलकर्णी यांच्यासह मालमत्ता कर विभागातील सर्व कर निरीक्षक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील मालमत्ता कर वसुली, चालू आर्थिक वर्षातील उत्पन्न, मागील वर्षाची थकबाकी, आतापर्यंत वाटप करण्यात आलेली मालमत्ता कर बिले, प्रत्यक्ष जमा झालेला कर तसेच अद्याप वाटप न झालेल्या बिलांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक कर निरीक्षकाच्या कार्यक्षेत्रानुसार किती बिले वाटप करण्यात आली आहेत, किती बिले प्रलंबित आहेत आणि उर्वरित बिले कोणत्या तारखेपर्यंत वाटप केली जाणार आहेत, याची माहिती महापौरांनी संबंधितांकडून घेतली.
मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असून कर वसुलीमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश महापौर विनायक कोंड्याल यांनी यावेळी दिले. सर्व कर निरीक्षकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मालमत्ता कराची बिले दि. 20/09/2026 पर्यंत तातडीने वितरित करून कर वसुलीला गती द्यावी, तसेच थकबाकीदारांकडून प्राधान्याने वसुली करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
विशेषतः एक लाख रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता कर थकबाकी असलेल्या थकबाकीदारांना नोटिसा दि. 16/09/2026 पर्यंत वाटून पूर्ण करणेचे निर्देश दिले. तसेच संबंधित थकबाकीदारांकडून कराची वसुली करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असेही निर्देश बैठकीत देण्यात आले.
दरम्यान, ज्या कर निरीक्षकांच्या कार्यक्षेत्रात बिले वाटपाचे काम अपेक्षित प्रमाणात झालेले नाही किंवा थकबाकी वसुली अत्यल्प आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या कामगिरीची गांभीर्याने दखल घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. कामामध्ये सातत्याने हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार नोटीस देण्यासह कठोर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
“महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी मालमत्ता कराची प्रभावी वसुली अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांना वेळेत बिले उपलब्ध करून देणे, थकबाकीदारांशी सातत्याने संपर्क साधणे आणि कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे ही संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. कामात दिरंगाई करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही,” असे महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले.
तसेच येत्या २० तारखेच्या आत सोलापूर शहरातील मालमत्ता कराची सर्व प्रलंबित बिले वाटप करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश महापौरांनी बैठकीत दिले. प्रत्येक कर निरीक्षकाने आपल्या कार्यक्षेत्रातील उर्वरित बिले निर्धारित मुदतीत वाटप करून वसुलीची कार्यवाही सुरू करावी, असेही त्यांनी सांगितले.
महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी मालमत्ता कर वसुलीची मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. नियमित करदात्यांना प्रोत्साहन देतानाच मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या मालमत्तांवर विशेष लक्ष केंद्रित करून थकीत कराची वसुली करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीच्या शेवटी महापौर विनायक कोंड्याल यांनी सर्व कर निरीक्षकांना “लवकरात लवकर मालमत्ता कराची सर्व बिले वाटप करून वसुलीला गती द्यावी आणि महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रभावीपणे काम करावे,” अशा स्पष्ट सूचना दिल्या.










