सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील सन 2026-27 या वर्षासाठी सनाकारित वाळू घाटांच्या राज्यस्तरीय (SEAC व SEIAA) पर्यावरण समितीची अनुमती मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील वाळू गट निश्चित करण्यात आले असून, उपलब्ध संसाधनांच्या आधारे जिल्हा सर्वेक्षण अहवाल (PART 1) तयार करण्यात आला आहे.
या अहवालात वाळू व्यतिरिक्त अन्य गौण खनिजे दगडखाण (PART 2) यांचाही समावेश करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालयाने दि. 25 जुलै 2018 व दि. 19 जून 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या वाळू/रेती उत्खनन मार्गदर्शक सूचनांनुसार (Enforcement and Monitoring Guidelines for Sand Mining-2020) अनुषंगाने हा जिल्हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे.
तरी सदर जिल्हा सर्वेक्षण अहवाल (DSR) नागरिकांच्या माहितीसाठी व अभिप्राय (Comments) नोंदविण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सदर जिल्हा सर्वेक्षण अहवालातील रेती घाटांच्या लिलावाच्या अनुषंगाने तसेच जिल्ह्यातील दगडखाणीबाबत आपले अभिप्राय व सूचना सादर कराव्यात. नागरिकांनी आपल्या सूचना खानिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत सादर कराव्यात किंवा miningofficersolapur@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात.










