सातारा : अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या पुण्यातील सी-डॅकचे निवृत्त शास्त्रज्ञ संजय शामराव कदम वय ६५ यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. कदम यांनी २१.१ किलोमीटरच्या सातारा येथे कास पठार मार्गावरील स्पर्धेत सुमारे १७ किलोमीटर अंतर पूर्ण केले होते. अंतिम टप्प्यात उतारावर धावत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. आणि ते कोसळले.
घटनास्थळी उपस्थित धावपटू व कार्डीओलॉजिस्ट डॉक्टर मुजावर व त्यांच्या वैद्यकीय पथकाने तातडीने सीपीआर दिला. त्यानंतर त्यांना कार्डियाक रुग्णवाहिकेतून साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत मुख्य रक्तवाहिनीत गंभीर ब्लॉकेज आढळून आल्यानंतर तातडीने अँजिओप्लास्टी करून स्टेंट बसविण्यात आला. उपचारानंतर त्यांची प्रकृती काही काळ स्थिर झाली होती; मात्र सुमारे चार तासांनी पुन्हा तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.
सातारा हिल हाफ मॅरेथॉन ही पश्चिम घाटातील तीव्र चढ-उतारामुळे देशातील कठीण हाफ मॅरेथॉनपैकी एक मानली जाते. यामध्ये देशभरातून अनेक धावपटू आपली क्षमता आजमावण्यासाठी भाग घेत असतात. यापूर्वी देखील सदर स्पर्धेत अशा घटना घडल्या असून या घटनेमुळे मॅरेथॉन सारख्या दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीत धावण्यापूर्वी हृदयाची तपासणी व फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक करणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे.









