सोलापूर- सोलापूर जिल्ह्यात अनुसूचित जाती-जमाती अधिनियम 1989 व सुधारित अधिनियम 2016 बाबत जागृती निर्माण करण्यासाठी जिल्हास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा गुरुवार, दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5.00 या वेळेत जिल्हा नियोजन भवन, सोलापूर येथे पार पडणार आहे, अशी माहिती समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी दिली.
कार्यशाळेत महसूल, वन, गृह, पोलीस, विधी व न्याय, ग्रामविकास, आरोग्य विभागातील अधिकारी तसेच जिल्हा व उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य सहभागी होणार आहेत. नागरी हक्क संरक्षण शाखेतील अधिकारी-कर्मचारी यांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे.या कार्यशाळेचा मुख्य उद्देश कायद्याबत जाणीव-जागृती निर्माण करणे, जातीय सलोखा वाढविणे आणि अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा आहे.
कार्यशाळेला जिल्हाधिकारी, सोलापूर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.ही कार्यशाळा सामाजिक न्याय विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.










