पंढरपूर : ऊस दराच्या प्रश्नावर साखर कारखानदारांनी घेतलेल्या दुटप्पी भूमिकेच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तसेच, येत्या २४ नोव्हेंबर रोजी भिमानगर (टेंभुर्णी )येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी लाखोच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा. राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते मा. महादेव जानकर यांनी शासकीय विश्रामग्रह पंढरपूर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत केले आहे.
ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची संयुक्त बैठक आज (दि. १९) सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र, राजू शेट्टी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे कठीण जाईल आणि त्यांची मागणी रास्त असल्याने त्यांच्यासमोर बोलता येणार नाही, या भीतीने कारखानदारांनी एक दिवस आधीच बैठक उरकून घेतली. कोणताही ठोस तोडगा न काढता शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न कारखानदारांकडून केला जात असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
राजू शेट्टी यांनी आजच्या शासकीय विश्रामग्रह येथे झालेल्या बैठकीत कारखान्यांच्या उत्पन्नाचा पोलखोल केली. सोलापूर जिल्ह्यात एकूण ३९ साखर कारखाने आहेत. यापैकी १४ हून अधिक कारखान्यांची साखर रिकव्हरी ११ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तर ११ कारखान्यांची रिकव्हरी ९.७५ ते १०.७५ टक्के इतकी आहे. या आकडेवारीनुसार सर्व कारखान्यांना शेतकऱ्यांना ३५०० रुपये पहिली उचल देणे सहज शक्य आहे.
तरीही, सर्वपक्षीय साखर कारखानदारांनी आपापसातील गट-तट विसरून एकत्र येत शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.कारखानदारांच्या या भूमिकेचा निषेध म्हणून आजपासून जिल्ह्यातील कारखान्यांचे काटे बंद ठेवण्यात येणार असून, २४ नोव्हेंबरच्या महामार्ग रोको आंदोलनात जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांनी केले आहे.










