स्वच्छता, पाणीपुरवठा, भाविकांच्या सुविधा व वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देण्याच्या सूचना
पंढरपूर : कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आज वाखरी पालखी तळ, सरगम चौक, चंद्रभागा वाळवंट व भक्तीसागर परिसराची पाहणी करून संबंधित विभागांकडून तयारीचा आढावा घेतला. यात्रा कालावधीत भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
कार्तिकी शुद्ध एकादशी २१ नोव्हेंबर रोजी असून, यात्रा कालावधी १० ते २४ नोव्हेंबर असा आहे. या काळात राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने वारकरी व भाविक पंढरपुरात दाखल होतात. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी करून व्यवस्थेची माहिती घेतली.
चंद्रभागा नदीपात्र व घाट परिसरात स्वच्छता कायम राखण्यासाठी अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी नियुक्त करावेत. नदीकाठावरील काटेरी झाडे-झुडपे काढावीत, घाटांवरील माती हटवून घाट स्वच्छ धुऊन घ्यावेत. घाटांच्या कोपऱ्यांमध्ये साचलेला कचरा तातडीने हटवावा. नदीपात्रात वाहनांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. वाळवंटात खाद्यपदार्थ व माळा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमुळे अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितले.
भक्तीसागर परिसरात दिंड्यांसोबत येणारे वारकरी व भाविक मोठ्या संख्येने वास्तव्यास असतात. त्यांच्या सोयीसाठी नदीपात्रात जाण्या-येण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या घाटाचे मुरुमीकरण व सपाटीकरण तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
वाखरी पालखी तळावर कार्तिकी यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार भरतो. या ठिकाणी जनावरे व पशुपालकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. जनावरांच्या उपचारासाठी २४ तास पशुवैद्यकीय पथक कार्यरत ठेवावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
सरगम चौक येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे काम सुरू असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने आवश्यक उपाययोजना करून वाहतूक सुरळीत राहील, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा प्रणिती भालके यांनी चंद्रभागा वाळवंटात महिलांसाठी चेंजिंग रूमची संख्या वाढविणे तसेच परिसरात वेळोवेळी जंतुनाशक फवारणी करण्याची सूचना केली.
या पाहणीवेळी नगराध्यक्षा प्रणिती भालके, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी सीताराम डुबल, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजीत औटी आदी उपस्थित होते.














