येस न्युज नेटवर्क : अभिनेता, निर्माता, रॅपर अशा एक न अनेक कलांमध्ये तरबेज असणारं हॉलीवूडमधील नाव म्हणजे ‘विल स्मिथ’. नुकतच यंदाच्या ऑस्कर्स पुरस्करांचं वितरण झालं यावेळी अभिनेता विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ऑस्कर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याला ‘किंग रिचर्ड’ या चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर वयाच्या 53 व्या वर्षीही हॉलीवूडसारख्या मोठ्या फिल्म इंडस्ट्रीत सर्व अभिनेत्यांना पछाडत ऑस्कर जिंकणाऱ्या विलच्या कारकिर्दीवर एक नजर फिरवूया…
25 सप्टेंबर, 1968 रोजी युनायटेड स्टेट्सच्या फिलाडेल्फिया शहरात जन्माला आलेला विलार्ड कॅरोल स्मिथ म्हणजेच आजचा आघाडीचा हॉलीवूड अभिनेता विल स्मिथ. आपल्या फ्रेश प्रिन्स या स्टेज नेमनेही प्रसिद्ध असणारा विल अभिनेता, निर्माता, रॅपर अशा विविध रोल्समध्ये अप्रतिम कामगिरीसाठी प्रसिद्ध आहे. ऑस्कर्स, गोल्डन ग्लोब पुरस्कार, स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड पुरस्कार, ब्रिटीश अॅकेडमी पुरस्कारांसह अनेक इतर पुरस्कारांनी विलचा आजवर सन्मान करण्यात आला आहे. त्याच्या सिनेमांनी आजवर कोट्यवधींची कमाई जगभरातील बॉक्स ऑफिसवर केली असून अनेक आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफीस रेकॉर्ड्स त्याच्या नावावर आहेत.