सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत काल दिवसभर विविध प्रकारचा तमाशा तसेच काही नाट्यमय घडामोडी पाहून 102 जागांसाठी नॉर्थकोट प्रशालेत येड्यांची जत्रा भरली अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पक्ष आणि निष्ठा खुंटीला बांधून तिकीट कापताच अनेकांनी इतर पक्षांची उपरणी घातली. आत्मदहन किंवा दगड फेकीच्या भीतीपोटी भाजपने 20 तास झाले तरीही अधिकृत यादी जाहीर केली नाही. एबी फॉर्म वेळेत आला की नाही याबाबत तसेच एकूण किती अर्ज दाखल झाले याबाबत महापालिका प्रशासनाने अधिकृत माहिती दिली नाही. अनेक उमेदवारांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. सर्वत्र संशय कल्लोळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरेश पाटील, कुमुद अंकाराम, राजेश काळे, यांची तिकिटे भाजपने कापली. कुमुद अंकाराम यांनी लगेच शिवसेनेचे उपरणी गळ्यात घातले. काँग्रेस मधून शरद पवार गटात आणि आता दहा दिवसांपूर्वी अजित पवार गटात आलेल्या माजी महापौर बेरिया यांनी ऐनवेळी समाजवादी पार्टीतून उमेदवारी दाखल केली. सुशील बंदपट्टे यांनी काँग्रेस सोडून पंधरा दिवसापूर्वीच भाजपात आले आणि त्यांनी ऐनवेळी अजित पवार गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना शिंदे गटाने 51 उमेदवारांची यादी तयार ठेवली होती ऐनवेळी उमेदवार बदलण्यात आले. एवढे दिवस शिवसेने सोबत एकनिष्ठ राहणाऱ्या आणि मधून अधून राजीनामा अस्त्र उगारणाऱ्या गणेश वानकर यांना आणि पुरुषोत्तम बर्डे यांच्या कन्या उत्तरा बर्डे यांनाही भाजपने उमेदवारी दिली.. प्रशासन आणि भाजप यांची भूमिका संशयास्पद आणि पारदर्शक नसल्यामुळे मतदार आणि उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे.

