सोलापूर महापालिकेतील प्रशासकीय शिस्त पूर्णपणे बिघडली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्यांच्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही त्यामुळे मनमानी सुरू आहे. सामान्य प्रशासन विभागामध्ये तर ऐकावं ते नवलच असं सुरू आहे. सहाय्यक आयुक्त सोनाली यादव यांच्या परस्पर अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. त्यामुळे त्या वैतागल्या आहेत. या विभागात सहाय्यक आयुक्त युवराज गाडेकर यांनीच नेमलेल्या कर्मचाऱ्यांचे वर्चस्व आहे. काही कर्मचारी तर आठ आठ नऊ -नऊ वर्ष एकाच टेबलवर ठाण मांडून बसले आहेत. लाड कमिटी मधील कर्मचाऱ्यांना नियुक्ती, कर्मचाऱ्यांच्या बदल्या, जूनियर इंजीनियर यांच्या बदल्या अशा प्रकरणात काही क्लर्क करोडपती झाले आहेत.
वीरेश स्वामी, मल्लिनाथ उटगी यांना कोणत्या अधिकाऱ्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे हे देव जाणे. स्वामी यांना तर सोलापूर महापालिकेतील सचिन वाझे समजले जाते. असली भ्रष्ट टीम महापालिकेत असल्यामुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे हाल सुरू आहेत. याच जीएडीच्या भ्रष्ट टीमच्या दुर्लक्षामुळे महत्त्वाचे रबरी शिक्के जून महिन्यात गायब झाले होते.अद्याप त्यावर काहीच कारवाई झाली नाही. अशा गंभीर बाबीकडे महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांना लक्ष द्यायला वेळ नाही हे दुर्दैव.









