सोलापूर महापालिकेतील प्रशासकीय शिस्त पूर्णपणे बिघडली आहे. आयुक्त सचिन ओंबासे यांच्या कार्यपद्धतीवर बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी नाराज आहेत. चोराला सन्मान आणि संन्याशाला फाशी अशी कार्यपद्धती असल्यामुळे काम करणारे कर्मचारी अक्षरशः व्हीआरएस घेण्याच्या तयारीत आहेत. बांधकाम,रस्ते, आरोग्य, भूमी मालमत्ता या विभागातील अनेक गैरप्रकार चव्हाट्यावर आले तरीही एकाही अधिकाऱ्याविरुद्ध ठोस कारवाई आयुक्तांनी केली नाही. निवडणुकीमध्ये केलेला कोट्यावधी रुपये खर्च संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आरोग्य विभागाकडून भूमी मालमत्ता विभागाकडे वसुलीसाठी पाठविण्यात आलेल्या आठ कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ करण्याचे आदेश दिल्यामुळे ते कर्मचारी घाबरून गेले आहेत. याच कर्मचाऱ्यांनी 70-ते 80 लाख रुपये वसुली आणली आहे.
भूमी मालमत्ता विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून रुजू झालेले कुलकर्णी बिनकामाचे आहेत तरीही त्यांच्यावर कोणतीच ॲक्शन घेतली जात नाही. झोन अधिकारी तसेच खाते प्रमुख यांच्यावर आयुक्तांचे वर्चस्व नाही त्यामुळे हे अधिकारी थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेतात. उदंड झाले अधिकारी मात्र कामाचा पत्ता नाही अशी अवस्था महापालिकेत आहे..एकूणच शहरातील महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडल्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.








