सोलापूर : सोलापूर येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० च्या समादेशक कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार सुभाष देशमुख, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस प्रशिक्षक विजयकुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त अश्विनी पाटील, कार्यकारी अभियंता (सा. बां.) दिनेशसिंह परदेशी, पोलीस गटाच्या समादेशक दीपाली काळे आदी मान्यवर, अधिकारी व राज्य राखीव पोलीस दलाचे जवान उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. गोरे म्हणाले, समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जेव्हा अतिरिक्त पोलीस बळाची आवश्यकता भासते, तेव्हा राज्य राखीव पोलीस दलाची गरज असते. अशावेळी हे जवान आपले घर, कुटुंब सोडून समाजाच्या संरक्षणासाठी बंदोबस्तासाठी दूरवर जात असतात. त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू व इतर सोयीसुविधा पुरवणे ही शासनाची जबाबदारी असून, शासन त्यासाठी कटिबद्ध आहे.
या कॅम्पसमध्ये समादेशक कार्यालयाची अतिशय सुंदर इमारत होत असून, या इमारतीमुळे राज्य राखीव पोलीस गटातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढून त्यांच्यामध्ये एक नवी ऊर्जा निर्माण होईल, असेही पालकमंत्री श्री. गोरे यांनी सांगितले.
राज्य राखीव पोलीस दलातील कुटुंबातील महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून शिलाई कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावता येईल, असे आमदार सुभाष देशमुख यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात समादेशक दीपाली काळे यांनी राज्य राखीव पोलीस बल गटाच्या स्थापनेची माहिती दिली. तसेच या कॅम्पसमधील सुविधा, प्रशिक्षण तसेच जिल्हा नियोजन समिती मधून मंजूर करण्यात आलेल्या १० कोटी रुपये खर्चाच्या नवीन इमारतीबाबत माहिती दिली.













