राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गेल्याच महिन्यात सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. आरोग्य संवाद यात्रे अंतर्गत त्यांनी जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणांचे पोस्टमार्टम केले. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी,महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांना तसेच आरोग्य उपसंचालकांना त्यांनी विविध आदेश दिले. यातील थोडीफार कारवाई झाली मात्र मंत्र्यांनी दिलेले बहुतांश आदेश अधिकाऱ्यांनी केराच्या टोपलीत टाकले. त्यामुळे मंत्री आदेश देतात आणि नंतर अधिकारी त्यांना मॅनेज करतात अशी बहुतांश कार्यपद्धती दिसू लागली आहे. ग्रामीण रुग्णालय वडाळा, आणि ग्रामीण रुग्णालय करकंब येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारींचा पाढा स्थानिक नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी आरोग्यमंत्र्यांसमोर मांडला. करकंब ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर स्वाती बोधले, तसेच वडाळा ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर शंकर बोरकर या दोघांना निलंबित करा असे आदेश मंत्र्यांनी दिले होते. उपसंचालकांना निलंबित करण्याचे अधिकार आहेत मात्र याबाबत टाइमपास केला जात आहे. विशेष म्हणजे डॉक्टर स्वाती बोधले यांना निलंबित करण्याऐवजी त्यांना मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाचा पदभार देऊन पदोन्नती केली आहे. चार नोव्हेंबर रोजी सोलापुरात सर्वांच्या साक्षीने मंत्री अबिटकर यांनी आरोग्य उपसंचालक पवार तसेच जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा डोईफोडे यांना कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. मात्र या दोघांनीही आरोग्यमंत्र्यांच्या आदेशाला किंमत दिली नाही असेच दिसून येते.










