अनुभव, आकलन आणि वैचारिक उंचीचा सन्मान
मराठी साहित्याच्या इतिहासात शतकाचा टप्पा गाठणारे ‘शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ पुण्याच्या ऐतिहासिक भूमीत संपन्न होत आहे, ही संपूर्ण मराठी सारस्वतांसाठी अत्यंत गौरवाची, अभिमानाची आणि ऐतिहासिक जबाबदारीची बाब आहे. शतकपूर्तीच्या या अभूतपूर्व सोहळ्याचे अध्यक्षपद ज्यांच्या खांद्यावर विराजमान होईल, त्यांचे व्यक्तिमत्त्व, साहित्यिक उंची, वैचारिक खोली आणि चळवळीशी असलेली बांधिलकी अत्यंत व्यापक व सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे. या सर्व निकषांवर तंतोतंत उतरणारे, सोलापूरच्या भूमीशी घट्ट नाते असलेले ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, कादंबरीकार आणि ‘सरस्वती सन्मान’ प्राप्त प्रा. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची या ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली आहे, ही बाब अत्यंत सार्थ, समयोचित आणि आनंददायी आहे.
. सोलापूर जिल्ह्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा हा बहुमान दुसऱ्यांदा मिळत आहे. यापूर्वी २००६ साली सोलापूरमध्ये ७९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते; त्या वेळी सोलापूरचेच ज्येष्ठ साहित्यिक, निसर्गलेखक आणि ‘अरण्यऋषी’ म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाली होती. निसर्ग, वन्यजीव आणि पर्यावरणाचे मर्म उलगडणाऱ्या चित्तमपल्ली यांच्यानंतर आता सामाजिक वास्तवाची भेदक मांडणी करणारे आणि जागतिक कीर्तीचे साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या रूपाने सोलापूरच्या साहित्यिक परंपरेचा गौरव पुन्हा एकदा उंचावला आहे.
. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावी १ जून १९५६ रोजी जन्मलेले डॉ. लिंबाळे यांचा जीवनप्रवास संघर्ष, जिद्द आणि ज्ञानसाधनेचा जिवंत दाखला आहे. सुरुवातीच्या काळात टपाल व तार विभागात टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करताना त्यांनी शिक्षण थांबवले नाही; १९८६ ते १९९२ या काळात त्यांनी सोलापूर आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणूनही काम केले. पुढे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून मराठीत एम.ए. पूर्ण केल्यानंतर त्यांनी ‘मराठी दलित साहित्य आणि अमेरिकन ब्लॅक साहित्य – एक तुलनात्मक अध्ययन’ या विषयावर पीएच.डी. संपादन केली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे सहाय्यक संपादक म्हणून सुरुवात करून ते याच विद्यापीठातून प्राध्यापक व संचालक पदावरून सेवानिवृत्त झाले. या शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रवासाने त्यांच्या लेखनाला अधिक वैचारिक शिस्त आणि अभ्यासू खोली दिली.
. प्रा. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी आपल्या प्रदीर्घ साहित्य प्रवासात सुमारे ४० ते ४४ पुस्तकांचे लेखन करून मराठी साहित्याची मोठी सेवा केली आहे.वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी लिहिलेल्या अक्करमाशी, (१९८४) या त्यांच्या आत्मकथनाने मराठी साहित्यात एक नवा अध्याय रचला.
समाजव्यवस्थेतील उपेक्षित आणि विषम वास्तव अत्यंत प्रामाणिकपणे व निर्भीडपणे मांडणाऱ्या या कलाकृतीचे इंग्रजीसह विविध भारतीय व जागतिक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने ‘द आऊटकास्ट’ या नावाने प्रसिद्ध केलेल्या या अनुवादाने मराठी आत्मकथनाला आणि दलित जाणिवांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. केवळ अनुभव कथनापुरते मर्यादित न राहता, त्यांनी आपल्या लेखनाने दलित आणि उपेक्षित साहित्याला तात्त्विक व सौंदर्यशास्त्रीय अधिष्ठान दिले. ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ या त्यांच्या ग्रंथाने साहित्यमीमांसेच्या क्षेत्रात मूलभूत भर घातली असून, ‘अनुभवापेक्षा अनुमानाला महत्त्व न देता अनुभवाचे सौंदर्यशास्त्र उभे करणे’ या त्यांच्या मांडणीमुळे हा ग्रंथ साहित्याच्या अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरला आहे.
. यासोबतच ‘दलित आत्मकथा – एक आकलन’, ‘भारतीय दलित साहित्य’, ‘साहित्याचे निकष बदलावे लागतील’, ‘सांस्कृतिक संघर्ष’, ‘शतकातील दलित विचार’ आणि ‘साठोत्तरी मराठी वाङ्मयातील प्रवाह’ यांसारख्या ग्रंथांतून त्यांनी साहित्यसमीक्षेला नवे वैचारिक निकष दिले आहेत. आत्मकथन आणि समीक्षेबरोबरच कादंबरी, कथा, कविता, चरित्र आणि सामाजिक विषयांवरील लेखनातही डॉ. लिंबाळे यांचे योगदान अत्यंत भरीव आहे. ‘उद्रेक’, ‘उपल्या’, ‘ओ’, ‘झुंड’, ‘दंगल’, ‘बहुजन’, ‘ब्राह्मण्य’, ‘भिन्नलिंगी’, ‘राणीमाशी’, ‘हिंदू’, ‘गावकुसाबाहेरील कथा’, ‘दलित ब्राह्मण’, ‘दलित पँथर’, ‘दलित प्रेमकविता’ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र असलेला ‘प्रज्ञासूर्य’ यांसारख्या त्यांच्या विपुल साहित्यसंपदेतून मानवी जीवन, सामाजिक संघर्ष आणि वास्तवाचे विविध पैलू प्रभावीपणे उलगडले आहेत.
. त्यांच्या या उत्तुंग साहित्यसाधनेची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. ‘सनातन’ या कादंबरीसाठी त्यांना के. के. बिर्ला फाऊंडेशनचा देशातील अत्यंत मानाचा ‘सरस्वती सन्मान’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी विजय तेंडुलकर आणि महेश एलकुंचवार यांच्यानंतर हा सन्मान मिळवणारे ते मराठीतील महत्त्वाचे साहित्यिक ठरले. तसेच भोसरी (पुणे) येथे २०१९ मध्ये भरलेल्या २०व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात त्यांना ‘प्रा. रा. ग. जाधव साहित्यसाधना पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. याशिवाय २०११ मध्ये नांदेड येथे पार पडलेल्या १२ व्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी अत्यंत यशस्वीरीत्या भूषवले आहे.
—–संमेलनाच्या माध्यमातून साहित्याची जबाबदारी —–
. शंभराव्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून डॉ. लिंबाळे यांनी आपल्या साहित्याच्या आणि वैचारिक भूमिकेच्या माध्यमातून बदलत्या काळातील मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याचे महत्त्वाचे कार्य हाती घेणे आवश्यक आहे. डिजिटल युगात आणि माहितीच्या अतिरेकात वाचनसंस्कृती सुदृढ करणे, नव्या पिढीला साहित्याशी व मूलभूत वाचनाशी पुन्हा जोडणे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करणे, ही काळाची गरज आहे. समाजातील विषमता, उपेक्षा, पर्यावरणीय आव्हाने आणि मानवी नात्यांतील संवेदनशीलता या विषयांवर निर्भीड व समतोल लेखन करत, साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता सामाजिक परिवर्तनाचे आणि समतेचे प्रभावी माध्यम कसे राहील, याची दिशा त्यांनी आपल्या साहित्यातून व भाषणातून स्पष्ट करावी. मराठीतील विविध साहित्यप्रवाहांना एकत्र आणून सर्वसमावेशक संवाद घडवणे, हे त्यांच्या अध्यक्षपदाचे मोठे वैशिष्ट्य ठरू शकेल.
. —- संमेलनाच्या यशस्वितेसाठी सामूहिक प्रयत्न ——
शतकमहोत्सवी साहित्य संमेलन हे केवळ औपचारिक सोहळा न राहता खऱ्या अर्थाने वैचारिक, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन उत्सव ठरावे, यासाठी संमेलनाचे अध्यक्षपद आणि आयोजक यंत्रणा यांच्यात समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे. डॉ. लिंबाळे यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाखाली संमेलनातील परिसंवाद, कविसंमेलने, ग्रंथप्रदर्शने आणि चर्चासत्रे ही केवळ ठराविक मुद्द्यांपुरती मर्यादित न राहता समकालीन वास्तवाला भिडणारी असावीत. सर्व साहित्यिक प्रवाह, नवोदित लेखक, वाचक, शिक्षक, विद्यार्थी आणि रसिक यांचा सक्रिय सहभाग लाभल्यास हे संमेलन खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. शतकी वाटचालीचा आढावा घेत पुढील शतकाची साहित्यिक व सांस्कृतिक दिशा ठरवणारा हा सोहळा मराठी मनात चिरंतन स्थान निर्माण करेल, असा विश्वास वाटतो.
. शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे केवळ एक साहित्यिक आयोजन न राहता, बदलत्या काळातील मराठी भाषेची, साहित्याची, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आणि सामाजिक समतेची दिशा ठरवणारे व्यासपीठ ठरावे, अशी सर्वांची अपेक्षा आहे. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्यासारख्या ज्येष्ठ, व्यासंगी, अनुभवी आणि जागतिक कीर्तीच्या साहित्यिकाची सर्वानुमते झालेली निवड शतकमहोत्सवी संमेलनाच्या लौकिकात मोलाची भर घालणारी आणि सोलापूरच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा रोवणारी ठरली आहे.
पद्माकर मा. कुलकर्णी,
सोलापूर जिल्हा प्रमुख,
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे.












