भारतीय संविधान म्हणजे हजारो वर्षांच्या संघर्षातून मिळालेल्या स्वातंत्र्याला लोकशाहीची दिशा देणारा,भारतीय लोकशाहीचा आत्मा आणि कोट्यवधी भारतीयांना समानतेचा अधिकार देणारा ग्रंथ. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपल्या संविधान सभेने भारतीय संविधानाचा स्वीकार केला. म्हणूनच हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो.
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. पण स्वतंत्र भारताचा कारभार कसा चालणार? नागरिकांना कोणते अधिकार मिळणार? सरकारची रचना कशी असणार? समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान न्याय कसा मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या संविधानाने दिली. भारतीय संविधान तयार करण्यासाठी २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवस इतका कालावधी लागला. डॉ. राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. संविधानाच्या उद्देशिकेतील प्रत्येक शब्द आपल्याला काहीतरी शिकवतो. सार्वभौम म्हणजे आपला देश स्वतंत्र आहे. समाजवादी म्हणजे सामाजिक आणि आर्थिक समानतेचा विचार. धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्व धर्मांना समान आदर. लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी चालवलेले आणि लोकांसाठी असलेले शासन. गणराज्य म्हणजे देशाचा प्रमुख हा वंशपरंपरेने नव्हे, तर घटनात्मक प्रक्रियेद्वारे निवडला जातो. संविधान आपल्याला सहा मूलभूत अधिकार देते. पण त्याचबरोबर अकरा मूलभूत कर्तव्यांचीही जाणीव करून देते.जात, धर्म, भाषा, प्रांत यापलीकडे जाऊन आपण सर्व भारतीय आहोत, ही एकतेची भावना संविधान आपल्यात रुजवत.
भारतीय संविधान हा आपल्या देशाचा सर्वोच्च कायदा आहे. देशाचा कारभार कसा चालवायचा, नागरिकांचे अधिकार कोणते, सरकारची कर्तव्ये कोणती आणि देशातील लोकशाही व्यवस्था कशी असावी, याचे मार्गदर्शन संविधान करते.
सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य ही संविधानाची वैशिष्ट्य आहेत. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही उद्देशिकेतली चार प्रमुख मूल्ये आहेत. समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, घटनात्मक उपायांचा अधिकार हे अधिकार सांगितले आहेत.
संविधानाचा आदर करणे, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे, स्वातंत्र्यलढ्यातील आदर्शांचे पालन करणे, देशाचे सार्वभौमत्व, एकता व अखंडता जपणे, देशाचे संरक्षण करणे, बंधुभाव वाढवणे, स्त्रियांचा सन्मान राखणे
सांस्कृतिक वारसा जपणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि हिंसेचा त्याग करणे, उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे आणि ६ ते १४ वर्षांच्या मुलांना शिक्षणाची संधी देणे ही मूलभूत कर्तव्य सांगितली आहेत.
संविधानाने आपल्याला लोकशाही दिली आहे. आता ती अधिक सक्षम, समृद्ध आणि न्याय्य बनवण्याची जबाबदारी आपली आहे. संविधान समजून घेऊया, संविधान जगूया आणि संविधानातील मूल्यांनी भारत घडवूया!
जय हिंद!
अक्षता केळकर










