सोलापूर- देशभक्तीचा तिरंगा आणि पर्यावरण संवर्धनाचा हिरवा संदेश यांची सांगड घालत ‘एक पेड भारत के नाम’ आणि ‘हर घर तिरंगा, हर घर पेड’ हा अभिनव उपक्रम सोलापूर शहरात राबविण्यात येत आहे.शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पर्यावरण रक्षक तथा सोलापूरच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांच्या पुढाकाराने इको नेचर क्लबच्या माध्यमातून शासनाची कार्यालये, सोसायट्या, शाळा तसेच विविध सार्वजनिक परिसरांमध्ये वृक्षलागवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या आवाहनाला प्रतिसाद देत उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर स्वतः विविध ठिकाणी संबंधित अधिकारी, कर्मचारी, संस्था व नागरिकांशी समन्वय साधून वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धनाचे कार्य पुढे नेत आहेत.याच उपक्रमांतर्गत आज भारत सरकारच्या इंदिरानगर पोस्ट ऑफिस परिसरात फुलझाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. पर्यावरण रक्षक उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पोस्ट ऑफिसचे अधिकारी अमर कुलकर्णी, पायल पवार, पर्यावरणदूत तथा इको नेचर क्लबचे संस्थापक डॉ. मनोज देवकर, तसेच पोस्ट ऑफिसमधील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.‘एक पेड भारत के नाम’ या संकल्पनेतून प्रत्येक नागरिकाने देशभक्तीची भावना कृतीतून व्यक्त करत एक झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.‘हर घर तिरंगा, हर घर पेड’ या संकल्पनेतून सोलापूर शहर अधिक हिरवे, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी प्रत्येक घर, शाळा, सोसायटी आणि कार्यालयाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी केले.









