सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व विधवा पत्नींना कळविण्यात येते की, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक, त्यांच्या पत्नी व पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, नाट्य व इतर क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजक पुरस्कार प्राप्त, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, आग, दरोडा, अपघात किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे तसेच देश व राज्याची प्रतिष्ठा वाढवेल अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक, पत्नी व पाल्य यांना हा पुरस्कार देण्यात येईल.
त्याचबरोबर सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी मध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त आणि 12 वी मध्ये 85 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणारे, पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले तसेच IIT, IIM, AIIMS अशा नामवंत संस्थांमध्ये प्रवेश मिळालेले माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांनी देखील विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करावेत.
या पुरस्कारासाठी 10 हजार रुपये, 25 हजार रुपये, 50 हजार रुपये आणि 1 लाख रुपये अशी पुरस्काराची रक्कम आहे.
आवश्यक कागदपत्रे –
वैयक्तिक अर्ज (जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असलेला डी.डी. 40 विहित नमुना फॉर्म), पाल्य शिकत असल्याबाबतचा बोनाफाईड दाखला, मार्कशीटची साक्षांकित प्रत, माजी सैनिक, विधवेच्या ओळखपत्राची छायांकित प्रत, डिस्चार्ज बुकमधील फॅमिली डिटेलच्या पानाची झेरॉक्स प्रत, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, आधार कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबाबतचे प्रमाणपत्र, वर्तमानपत्रातील प्रसिद्धी व फोटो याबाबतची कागदपत्रे.
विहित नमुन्याचा फॉर्म जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे उपलब्ध असून अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2026 आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर (दूरध्वनी क्र. 0217-2992336) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.











