स्वच्छ सर्वेक्षण 2025 -26 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शहरांना राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांच्या हस्ते कालच दिल्लीमध्ये गौरविण्यात आले. दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या गटात पिंपरी चिंचवड महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक तर देशात सातवा मिळवला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी पुणे देशात दहाव्या क्रमांकावर होते ते यंदाचे वर्षी स्वच्छतेच्या बाबतीत चांगली कामगिरी न झाल्यामुळे 27व्या क्रमांकावर गेले आहे. नवी मुंबई हे शहर देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून तर गुजरात मधील सुरत दुसऱ्या क्रमांकावर आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरा ंच्या स्पर्धेत उज्जैन प्रथम चंदीगड द्वितीय तर गुंटूर तिसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. याच गटामध्ये सोलापूर शहर 2023 -24 मध्ये देशात 67 व्या क्रमांकावर होते. गेल्या वर्षी ते 23व्या क्रमांकावर आले होते. यंदाच्या वर्षी मात्र जाहीर झालेल्या यादीमध्ये सोलापूरच्या उल्लेख कुठेच आढळत नाही. सोलापुरातील घनकचरा व्यवस्थापन, वाढलेली धूळ, कचऱ्याचे न होणारे वर्गीकरण, नागरिकांचा सहभाग, तसेच तब्बल 85 कोटी रुपये खर्चून देखील केंद्र सरकारच्या एनकॅप मधून धुळमुक्त योजनेत झालेली निकृष्ट दर्जाची कामे या कारणास्तव सोलापूरचे नाव स्वच्छ शहर स्पर्धेतून वगळले अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे याचा विचार आता महापालिका प्रशासन तसेच पदाधिकाऱ्यांना करावा लागणार आहे. स्वच्छतेच्या बाबतीत घाणेरड्या सोलापूर शहराला खूप मोठे काम उभा करावे लागणार आहे,नाहीतर या स्पर्धेतून सोलापूर कायमचे बाहेर फेकले जाऊ शकते.










