गावनिहाय आढावा घेत सूक्ष्म नियोजनावर भर; सर्व तालुक्यांच्या गटविकास अधिकारी व विभागप्रमुखांची उपस्थिती
सोलापूर : ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे आणि समन्वयाने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) सूर्यकांत भुजबळ उपस्थित होते. बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गावनिहाय अभियानाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अभियानाची उद्दिष्टे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी प्रत्येक तालुक्याने सूक्ष्म नियोजन (मायक्रो प्लॅनिंग) करावे. गावनिहाय कामांचे नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
अभियानांतर्गत प्रत्येक गावातील कामांची सद्यस्थिती, प्रलंबित बाबी, उद्दिष्टपूर्ती आणि आवश्यक उपाययोजना यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून अभियानातील प्रत्येक घटक प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करावी, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.











