अमूलच्या दरवाढीनंतर गोकुळकडूनही हालचाली; दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही दरवाढीचा लाभ देण्याचा प्रयत्न
येस न्यूज मराठी: दिवाळीनंतर सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा आणखी एक फटका बसण्याची शक्यता आहे. मदर डेअरी आणि अमूलपाठोपाठ आता कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाकडूनही दूध विक्री दरात वाढ करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. गोकुळचे नूतन चेअरमन राजेश पाटील यांनी दूध विक्री दरवाढीचे संकेत दिले आहेत. अमूलने दुधाचे दर वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर गोकुळकडूनही दरवाढीचा विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शनिवारी होणाऱ्या नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विक्री दरात वाढ केल्यास त्याचा लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही दरवाढीच्या स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
यापूर्वी अमूलने १२ नोव्हेंबरपासून दुधाच्या दरात प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ लागू केली आहे. यामध्ये अमूल ताजा टोण्ड दूध २ रुपयांनी, तर अमूल गोल्ड ४ रुपयांनी महागले आहे.
जनावरांचा हिरवा व सुका चारा, पशुखाद्य, पॅकेजिंग आणि वाहतूक खर्चात झालेली वाढ ही दूध दरवाढीमागील प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे. आता गोकुळच्या निर्णयाकडे ग्राहकांसह दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.











