सोलापूर : परीक्षेच्या कामकाजात चुका करणाऱ्या प्राध्यापकांवर विद्यापीठाने केली कारवाई !

0
13


कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी उचलले कडक पाऊल

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेच्या कामकाजात हलगर्जीपणा तसेच चुका करणाऱ्या पेपरसेटर प्राध्यापकांवर कडक कारवाई करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

गेल्या 14 जुलैपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन बहुपर्यायी प्रश्नांद्वारे चालू आहेत. या परीक्षेचा आढावा कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी शुक्रवारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर तसेच अधिकाऱ्यांकडून जाणून घेतला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एमए अभ्यासक्रमाच्या उर्दू परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत पेपर सेटर करणाऱ्या प्राध्यापकांमुळे गंभीर चुका आढळल्या होत्या. त्याची समितीकडून चौकशी करण्यात आली. दोषी आढळलेल्या प्राध्यापकावर दंडात्मक कारवाई झाली आहे. त्याचबरोबर परीक्षेच्या कामकाजातून त्यांना काढून टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर एमए भाग एक मराठी विषयाच्या पेपरमध्येही चुका आढळल्या आहेत, त्याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाणार आहे. काही चुकीच्या पेपर सेटर करणाऱ्या प्राध्यापकांच्या हलगर्जीपणामुळे विद्यापीठास नाहक त्रासाला समोरे जावे लागत आहे. याची गंभीर दखल विद्यापीठ प्रशासन घेतली असून परीक्षेच्या कामकाजात म्हणजेच प्रश्नपत्रिकेत व इतर बाबींमध्ये चुका करणाऱ्या पेपरसेटर करणारे प्राध्यापक असो अथवा अधिकारी, कर्मचारी असो यांची आता गय केली जाणार नसून त्यांच्यावर विद्यापीठ अधिनियमानुसार कडक कारवाई करण्यात आल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले.

मात्र विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही, याची खबरदारी आपण घेतल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना जितके काही चांगले देता येईल, ते आपण देण्याच्या प्रयत्नात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.