सोलापूर : जिल्ह्याच्या विकासासाठी आखलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि खासगी गुंतवणूक आकर्षित करण्यात सोलापूर जिल्हा प्रशासनाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जागतिक बँकेच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या महा-स्ट्राईड ऑपरेशन २०२५-२६ अंतर्गत सोलापूर जिल्हा राज्यातील १३ पात्र जिल्ह्यांमध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. या कामगिरीबद्दल जिल्ह्याला तब्बल १६ कोटी रुपयांचा कामगिरीआधारित प्रोत्साहन निधी मंजूर झाला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे पत्राद्वारे अभिनंदन केले आहे. जिल्हा प्रशासनाने निर्धारित उद्दिष्टांपेक्षा अधिक कामगिरी करून विकासाला नवी दिशा दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे.
८२ टक्के गुणांसह राज्यात चौथा क्रमांक
महा-स्ट्राईड ऑपरेशनच्या मूल्यांकनात सोलापूर जिल्ह्याने ८२ टक्के संयुक्त गुणांकन मिळविले आहे. राज्यातील १३ पात्र जिल्ह्यांमध्ये सोलापूरचा चौथा क्रमांक आला आहे. पुणे विभागातील चार जिल्ह्यांमध्ये सोलापूरने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.
खासगी गुंतवणुकीतून १४२ कोटींची उभारणी
जिल्ह्याच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या वार्षिक धोरणात्मक कृती आराखड्याची अंमलबजावणी करताना सोलापूर प्रशासनाने खासगी क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर दिला. या प्रयत्नांतून तब्बल १४२ कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक जिल्ह्यात आणण्यात प्रशासनाला यश आले.
खासगी भांडवलाची उभारणी, विकासाभिमुख उपक्रमांची अंमलबजावणी आणि जिल्ह्याचे सकल जिल्हा उत्पन्न वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे सोलापूरच्या कामगिरीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
उद्दिष्टांपलीकडे कामगिरी
महा-स्ट्राईड ऑपरेशनअंतर्गत निश्चित करण्यात आलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यापुरतेच प्रशासन मर्यादित राहिले नाही, तर त्यापेक्षा अधिक प्रभावी कामगिरी केली आहे. उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर, खासगी क्षेत्राचा सहभाग आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
या कामगिरीमुळे सोलापूर जिल्ह्याला मिळालेला १६ कोटी रुपयांचा प्रोत्साहन निधी हा केवळ आर्थिक पुरस्कार नसून जिल्ह्याच्या विकासकामांना मिळालेली राज्यस्तरीय पावती मानली जात आहे. या निधीच्या वापराबाबतची सविस्तर माहिती मित्राकडून देण्यात आली आहे.
पुढील काळात आणखी मोठ्या उद्दिष्टांची अपेक्षा
सोलापूर प्रशासनाने केलेल्या कामगिरीचे कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भविष्यात आणखी महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित करून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचे आवाहन केले आहे. खासगी गुंतवणूक वाढविणे, जिल्ह्याचे उत्पन्न वाढविणे आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने प्रशासनाने पुढील काळातही सातत्याने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्ह्याला १६ कोटींचा प्रोत्साहन निधी मिळाल्याने सोलापूरच्या विकासाच्या प्रयत्नांना आर्थिक बळ मिळणार असून, प्रशासनाच्या कामगिरीला राज्य सरकारकडून मिळालेली ही मोठी शाबासकी ठरली आहे.
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, जिल्हा प्रशासनाने या गतीने काम करत राहावे. विशेषतः खाजगी भांडवल उभारणी आणि जिल्ह्याचे GDDP म्हणजेच Gross District Domestic Product वाढवण्यासाठी अधिक महत्वाकांक्षी उद्दिष्टे ठेवावीत.
सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर झाल्याबद्दल जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला यांनी नियोजन भवन येथे केला. यावेळी नियोजन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्याच्या या यशामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही तो एक आदर्श ठरणार आहे.











