राज्यातील 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नये यासाठी शासनाच्या नियोजन विभागाने आजच शासन आदेश पारित केला आहे. यानुसार पाणीपुरवठ्याला पूरक असणारी सर्व प्रकारची कामे करावी असे सुचवण्यात आले आहे. जलसंधारण, जल पुनर्भरण पाण्याच्या टाक्या बांधणे, जलवाहिन्या टाकणे अशी कामे करता येणार आहेत मात्र सर्व प्रकारची नवीन होणारी बांधकामे, सिमेंट रस्ते, ग्रामीण भागात जन सुविधा योजनेतून होणारे रस्ते, ज्या ठिकाणी पाण्याचा वापर होतो अशी सर्व प्रकारची कामे करू नयेत अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा नियोजन समिती मधून दुष्काळ निवारण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी दहा टक्के निधी राखीव ठेवावा असे देखील या जीआर मध्ये नमूद आहे. नियोजन विभागाचा हा आदेश असल्यामुळे शहरी भाग तसेच ग्रामीण भागात या आदेशाचे पालन करावे लागणार आहे. जी कामे सुरू आहे ती तात्काळ बंद करणे ऐवजी त्या त्या प्राधिकरणाने त्याची सद्यस्थिती पाहून निर्णय घ्यावा असे आदेशात नमूद आहे. एवढे दिवस आचारसंहितेमुळे कामे थांबली आता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर देखील लोकप्रतिनिधींची मोठ्या प्रमाणावर कामे थांबली जाणार असून हा निधी पाणीपुरवठ्याच्या कामासाठी वर्ग केला जाणार आहे हे विशेष.










