सोलापूर : जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसून, शेतकऱ्यांना उसाचा योग्य मोबदला मिळावा, ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रमुख मागणी आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत उसाला पहिली उचल ३२५० रुपये, हंगाम संपल्यानंतर १०० रुपये आणि पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी आणखी १०० रुपये, असा एकूण ३४५० रुपये दर देण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र, साखर कारखानदारांनी हा दर देण्यास असमर्थता दर्शवली आहे. ३१५० रुपयांपेक्षा अधिक दर देणे परवडणार नसल्याची भूमिका कारखानदारांनी घेतल्याने ऊसदराचा तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी आणि शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे उसाचा मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.
या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत कारखानदारांनी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या निर्णयाचे पालन न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.
साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास २४ नोव्हेंबर रोजी भिमानगर येथे शेतकऱ्यांच्या सहभागातून सोलापूर-पुणे महामार्ग बेमुदत रोखण्यात येईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. ३४५० रुपयांचा दर देण्याची मागणी, कारखानदारांची ३१५० रुपयांवर भूमिका आणि प्रशासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी यावरून हा संघर्ष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना योग्य ऊसदर मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व्यक्त केला आहे.










