सोलापूर जिल्ह्यात अमृत सरोवरांची एकूण 139 कामे पूर्ण
"पाणी हे जीवनाचे मूळ आहे. पण आज जगभरात पाण्याची टंचाई ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. महाराष्ट्रातही पावसाचे अनियमितपणा, भूजलाचा अति उपसा आणि प्रदूषणामुळे पाणी संकट गडद होत आहे. अशा परिस्थितीत "जलसंधारण अभियान" हा केवळ सरकारी उपक्रम नसून, प्रत्येक नागरिकाच्या जगण्याशी निगडीत चळवळ आहे."
15 ते 21 ऑगस्ट 2026 दरम्यान संपूर्ण राज्यात जलसंधारण सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहाचे ब्रीदवाक्यच आहे – “माती वाचवा, पाणी वाचवा… भविष्य सुरक्षित करा.” असे आहे. तर 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत जलसंधारण अभियान राबवले जात आहे.
सोलापूरची यशोगाथा : अमृत सरोवर अभियान 100% पूर्ण
जलसंधारणाच्या दिशेने सोलापूर जिल्ह्याने देशाला आदर्श घालून दिला आहे. केंद्र सरकारच्या अमृत सरोवर अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्याला 75 सरोवरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र जिल्हा प्रशासनाच्या नियोजन आणि लोकसहभागातून हे उद्दिष्ट मागे टाकून एकूण 139 अमृत सरोवरांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(NHAI) सोलापूर व पंढरपूर विभाग, जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय, लघु पाटबंधारे Z.P. विभाग आणि मृद व जलसंधारण विभाग या चारही विभागांनी ही कामे युद्धपातळीवर पूर्ण केली.
या अभियानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पाणीसाठ्यात झालेली वाढ. NHAI च्या 70 कामांमधून 6200.32 घनमीटर, लघु पाटबंधारे च्या 39 कामांमधून 4666.09 घनमीटर आणि जलसंधारण विभागाच्या 30 कामांमधून 420.24 घनमीटर असे एकूण 11,286 घनमीटरहून अधिक पाणीसाठा पुनर्स्थापित होणार आहे.
तलावांमधील गाळ काढून तो रस्ते बांधणीसाठी वापरण्यात आल्याने दुहेरी फायदा झाला आहे. एकीकडे तलावाची साठवण क्षमता वाढली, तर दुसरीकडे रस्ते मजबूत झाले. प्रत्येक सरोवरासाठी पंचायत स्तरावरील अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि यूजर ग्रुप नेमण्यात आले असून, कामांची तपासणी करून अहवाल व फोटो पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत.
जलसंधारण का अपरिहार्य आहे?
- भूजल पातळीचे रक्षण: पावसाचे पाणी जमिनीत मुरवले तरच विहिरी-बोअरला पाणी टिकते. एक थेंब साठवला तर दहा थेंब भूजल वाढते.
- शेतीला आधार: बंधारे, शेततळी, नाला खोलीकरणामुळे खरीप-रब्बी दोन्ही हंगामात पाणी उपलब्ध होते. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढते.
- दुष्काळावर मात: साठवले पाणी उन्हाळ्यात गावाला आणि पशुधनाला उपयोगी पडते.
- पर्यावरण समतोल: पाणी असेल तर झाडे जगतात, पक्षी येतात आणि जैवविविधता टिकते.
जलसंधारण सप्ताहातील उपक्रम
या सप्ताहात जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
MahaWalkathon – Walk for Water : 21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता होम ग्राऊंड, सोलापूर येथून भव्य पदयात्रेला सुरुवात होणार आहे. डफरीन चौक, महात्मा गांधी पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते रंगभवन असा या पदयात्रेचा मार्ग आहे. यात शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक सहभागी होणार आहेत.
Reels स्पर्धा: माती व पाणी संवर्धन या विषयावर तरुणांसाठी रील्स स्पर्धा आयोजित केली आहे. प्रथम पारितोषिक 25,000, द्वितीय 15,000 आणि तृतीय 10,000 रुपये इतके बक्षीस ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.
15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री श्री. जयकुमार गोरे यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्घाटन झाले. नोंदणीसाठी http://register.mahaevent.co.in ही वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आपली जबाबदारी काय?
मोठे प्रकल्प सरकार करते, पण खरे जलसंधारण घरापासून सुरू होते. प्रत्येक नागरिकांनी पाणी बचत करणे ही काळाची गरज आहे. नळ गळत असेल तर तो त्वरित दुरुस्त करा. ब्रश करताना, भांडी धुताना नळ बंद ठेवा. घराच्या गच्चीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. अंगणात, शेताच्या बांधावर झाडे लावा. शेतात सेंद्रिय शेती आणि ठिबक सिंचनाचा वापर करा.
जिल्हा न्यायालयात नुकत्याच झालेल्या रक्तदान शिबिरात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे, “रक्तदान हे जीवनाला नवसंजीवनी देणारे कार्य आहे.” अगदी तसेच जलसंधारणही आहे. आज आपण वाचवलेला प्रत्येक लिटर पाणी हे उद्याच्या पिढीसाठी अमृत आहे.
पाणी हे विकत घेता येत नाही, ते फक्त जपता येते, संवर्धन करता येते. सोलापूर जिल्ह्याने अमृत सरोवरांच्या माध्यमातून दाखवून दिले आहे की इच्छाशक्ती असेल तर अशक्य ते शक्य होते. आता ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जलसंधारण अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा व अमृत सरोवर मध्ये प्रशासन व लोकसहभागातून उद्दिष्टापेक्षा मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी प्रयत्न करावेत. व जिल्ह्यात जलसंवर्धनाची चळवळ निर्माण करावी.











