सोलापूर जिल्ह्यामध्ये 12 नगरपरिषदांपैकी अकरा नगरपरिषदांमध्ये निवडणुका लागल्या होत्या.अनगर नगरपरिषद ही बिनविरोध झाली असून भाजपच्या प्राजक्ता पाटील या बिनविरोध नगराध्यक्ष झाले आहेत.
इतर नगरपरिषद व त्यांचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष याप्रमाणे – भाजपाने बार्शी, अक्कलकोट आणि मैंदर्गी नगरपरिषद काबीज केले असून बार्शीत तेजस्विनी कथले, अक्कलकोटमध्ये मिलन कल्याणशेट्टी आणि मैंदर्गी मध्ये अंजली योगिनाथ बाजारमठ हे नूतन नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दुधनी, सांगोला आणि मोहोळ या तीन नगरपरिषदा काबीज केले असून दुधनीत प्रथमेश शंकर म्हेत्रे, सांगोल्यात आनंद माने तर मोहोळमध्ये सिद्धी वस्त्रे यांच्या गळ्यात मतदारांनी नगराध्यक्ष पदाची विजयी माला घातली आहे.उबाठा सेनेने कुर्डूवाडीत एकमेव खाते उघडले असून जयश्री भिसे हे नूतन नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले आहेत.
अकलूज येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने विजय मिळवून रेश्मा अडगळे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत.
तीर्थक्षेत्र विकास आघाडीने पंढरपूर आणि मंगळवेढा मध्ये सत्ता काबीज केली असून पंढरपुरात डॉक्टर प्रणिती भालके तर मंगळवेढ्यात सुनंदा अवताडे या महिला उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
तसेच स्थानिक विकास आघाडीच्या मोहिनी सावंत यांनी करमाळ्यात विजयश्री खेचून आणली असून त्या नगराध्यक्ष बनल्या आहेत.
पक्षीय बलाबल पाहता सोलापुरात बारा पैकी चार जागा भाजपाने जिंकल्या असून सेनेने तीन, तीर्थक्षेत्र विकास आघाडीने दोन, उबाठा, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आणि स्थानिक विकास आघाडीने प्रत्येकी एक जागा जिंकल्या आहेत.

