सोलापूर : विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची अखेर सात महिन्यानंतर निवड जाहीर झाली. अक्कलकोटचे ज्येष्ठ नेते सातलिंग अण्णाराव शटगार यांची या पदावर निवड झाली.प्रसिद्धीप्रमुख, वरिष्ठ उपाध्यक्ष या जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या शिफारशीवरुन शटगार यांना हे प्रमोशन मिळाले.

पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीमध्ये सुशिलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे. लोकसभेत सोलापूरमध्ये काँग्रेसचे खासदार निवडून आले. पण विधानसभेला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे तत्कालिन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. दरम्यानच्या काळात पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. त्यामुळे पक्ष अडचणीत आला होता. स्वराज्य आगामी स्थानिक संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील मरगळ झटकण्यासाठी व संघटन वाढवण्यासाठी नव्या दमाच्या जिल्हाध्यक्षाची गरज होती, ती जबाबदारी आता शटगार यांच्यावर देण्यात आली.











