सोलापूर : रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालय येथे दिनांक ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा दिवस देशभरात बालिका दिन म्हणून साजरा केला जात असून त्यानिमित्ताने विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी निरामय संस्थेच्या अध्यक्षा सीमा किणीकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या कार्यावर आधारित भावपूर्ण अभिवादन सादर केले.
प्रमुख पाहुण्या सीमा किणीकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक व स्त्री-उत्थानासाठी केलेल्या कार्याचा जीवनपट प्रभावीपणे उलगडून सांगितला. त्या म्हणाल्या की, सावित्रीबाईंनी त्या काळातील रूढी-परंपरा, अंधश्रद्धा व अन्यायकारक चालीरीतींना ठामपणे विरोध केला. बालविवाह, स्त्री शिक्षणाचा अभाव, स्त्री भ्रूणहत्या, अस्पृश्यता अशा अनेक सामाजिक प्रश्नांविरोधात त्यांनी समाजाला जागृत केले.
स्त्री शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी सावित्रीबाईंनी अपार हालअपेष्टा सहन केल्या. शिक्षण देताना त्यांना समाजाकडून होणारा त्रास, अपमान आणि विरोध सहन करावा लागला; मात्र तरीही त्यांनी आपले कार्य थांबवले नाही. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊन मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहन किणीकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेचे विश्वस्त चारूकीर्ती शिरसोडे यांनी आपल्या वडिलांच्या स्वर्गीय श्री. भालचंद्र शिरसोडे यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून समाजोपयोगी उपक्रम राबविला. या प्रसंगी जयंती शिरसोडे तसेच त्यांच्या भगिनी शैलजा, नीता व संगीता यांनी शाळेस सदिच्छा भेट देऊन विद्यालयाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरूवातीस सीमा किणीकर यांचा सत्कार शाळेच सचिव सुनील दावडा यांचे हस्ते स्मृती चिन्ह आणि शाल देऊन करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी केले. सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन सचिव सुनील दावडा यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन बालिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला
