साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या, 11 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असून, आदिमायेच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यांतून लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर व्यवस्थापन आणि प्रशासन सज्ज झाले आहे. दर्शनासाठी स्टीलचे बॅरिकेडिंग, मंदिर परिसरात 311 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. दरम्यान, घाटरस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये आणि भाविकांचा प्रवास सुरळीत व्हावा, यासाठी सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या खासगी वाहनांना 20 ऑक्टोबरपर्यंत प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.











