येस न्युज नेटवर्क : शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची 11.35 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. NSEL घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने ठाण्यातील दोन फ्लॅट जप्त केले आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोपाला आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
सन 2013 मध्ये एनएसईएल घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास ईडीने ताब्यात घेत चौकशी सुरू केली. एनएसईएल घोटाळा प्रकरणात संचालकांसह 25 जणांविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार चौकशी सुरू झाली होती. या घोटाळ्यातील गुंतवणुकीची रक्कम आरोपींनी रिअल इस्टेट, थकीत कर्जाची परतफेड आणि इतक कामांसाठी बेकायदेशीरपणे वापरली असल्याचे समोर आले. जवळपास 13000 गुंतवणूकदारांच्या 5600 कोटींच्या रक्कमेचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
ईडीने केलेल्या तपासानुसार, आस्था ग्रुपकडे एनएसईएलची 242.66 कोटी थकबाकी रुपयांची थकबाकी होती. आस्था ग्रुपने सन 2012-13 या कालावधीत 21.74 कोटी रुपये विहंग आस्था हाऊसिंग प्रोजेक्टसाठी दिले. त्यापैकी 11.35 कोटी रुपये विहंग एंटरप्राइजेस आणि विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडकडे वळते करण्यात आले. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असल्याची माहिती ईडीने दिली.