सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री आणि भरण्याची प्रक्रिया आजपासून नॉर्थकोट प्रशालेत सुरू झाली. पहिल्याच दिवशी इच्छुकांनी अर्ज घेण्यासाठी एक ते सात निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी केली. मात्र यंदाच्या वेळी महापालिका निवडणूक यंत्रणा पहिल्याच दिवशी फेल झाल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांची व्यवस्थित नियोजन नाही. पावती पुस्तके संपली तरी ती द्यायला कोणी नाही. कर्मचाऱ्यांची वाणवा. वरिष्ठ अधिकाऱ्यांची दुर्लक्ष अशी स्थिती नॉर्थकोट प्रशालेत पाहायला मिळाली. महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांना याबाबत कल्पना दिल्यानंतर यंत्रा थोडी हालली मात्र उपायुक्त आशिष लोकरे यांनी याकडे दुर्लक्ष केले. महापालिकेच्या गलथान नियोजनाबद्दल इच्छुक उमेदवारांनी संताप व्यक्त केला. निवडणूक कार्यालय क्रमांक एक च्या निवडणूक निर्णय अधिकारी भैरप्पा माळी आणि दोनच्या विजया पांगारकर यांनी देखील महापालिकेच्या या नियोजनाबद्दल नाराजी व्यक्त केली तसेच काही अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

