सोलापूर- सोलापूर शहराच्या विकास आराखड्यानुसार (Development Plan – DP) नियोजित करण्यात येणाऱ्या विविध रस्त्यांमुळे बाधित होणाऱ्या खाजगी मिळकतधारकांना त्यांच्या बाधित क्षेत्राच्या मोबदल्यात हस्तांतरणीय विकास हक्क (Transferable Development Rights – TDR) देण्याची कार्यवाही महाराष्ट्र शासनाच्या एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) नुसार करण्यात येते. यापूर्वी ही संपूर्ण प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत होती.



सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी नागरिकांना अधिक पारदर्शक, सुलभ व गतिमान सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने TDR मंजुरी व प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया BPMS (Building Permission Management System) पोर्टलद्वारे पूर्णपणे ऑनलाईन करण्याचे निर्देश नगर रचना विभागास दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली असून सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच TDR प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आले आहे.
याअंतर्गत मिळकतधारक मल्लिकार्जून शिवशरण शेगावकर व विश्वनाथ शेगावकर यांना आज दि. 18 जून 2026 रोजी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते BPMS पोर्टलद्वारे TDR प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.सदर प्रकरणात मौजे मजरेवाडी येथील सर्व्हे क्र. 9/9, 9/7+8 व 9/7+8 मधील जागा विकास आराखड्यातील 9 मीटर, 12 मीटर, 18 मीटर व 30 मीटर रुंदीच्या DP रस्त्यांसाठी बाधित होत आहे. या बाधित क्षेत्राच्या मोबदल्यात संबंधित मिळकतधारकांना नियमानुसार हस्तांतरणीय विकास हक्क प्रदान करण्यात आले आहेत.
ही संपूर्ण प्रक्रिया BPMS प्रणालीद्वारे यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी उपसंचालक झगडे, सहायक संचालक शितोळे तसेच कार्यकारी अभियंता मठपती यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कनिष्ठ अभियंता सलमान मनियार आणि रोहित हारके यांनी तांत्रिक व प्रशासकीय स्तरावरील सर्व कार्यवाही पूर्ण करून हे पहिले ऑनलाईन TDR प्रकरण यशस्वीरीत्या निकाली काढले.
यावेळी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले की, “महानगरपालिकेच्या सेवा अधिक पारदर्शक, वेगवान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. TDR प्रक्रियेचे ऑनलाईनकरण हे त्याच दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल असून यामुळे मिळकतधारकांना कार्यालयीन फेऱ्या कमी होतील, प्रक्रियेला गती मिळेल तसेच संपूर्ण कार्यवाही अधिक पारदर्शक होईल. भविष्यातही महानगरपालिकेच्या विविध सेवांचे डिजिटायझेशन करून नागरिकांना अधिक सुलभ सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.”
सोलापूर महानगरपालिकेने राबविलेल्या या उपक्रमामुळे TDR मंजुरी प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढणार असून नागरिकांना जलद, पारदर्शक व विश्वासार्ह सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.











