सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेले उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे पथक उद्यापासून दुष्काळाची पाहणी करणार आहे. यामध्ये टीममध्ये कृषी, पाणीपुरवठा,अन्न व सार्वजनिक अशा तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संपूर्ण राज्यासाठी एकूण 11 अधिकाऱ्यांचा समावेश असलेले पथक आले असून सोलापूर जिल्ह्यात यातील तीन अधिकारी उद्या करमाळा बार्शी येथून सोलापुरात संध्याकाळी येणार आहे. उद्या सायंकाळी शासकीय विश्रामगृहात जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेऊन शनिवारी दक्षिण सोलापूर, मंगळवेढा तसेच सांगोला या तालुक्यांचा दुष्काळी दौरा या पथकाकडून केला जाणार आहे. राज्यात आठ ते 11 ऑक्टोबर दरम्यान हे पथक टंचाईग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट देऊन शेती नुकसान, चारा टंचाई, पाणी टंचाई याची पाहणी करणार आहे. त्यामुळे या दुष्काळी पथकाचा अहवाल केंद्राला सादर झाल्यानंतर नोव्हेंबर अखेरपर्यंत प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळेल असे दिसते.









